प्रतिनिधी / सातारा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश दिलेले आहेत. त्या आदेशाची पायमल्ली करुन सदरबझार येथील बिस्मिला हॉटेल रात्री आठ वाजता उघडे ठेवल्या प्रकरणी हॉटेल मालक व तेथे जेवणार्या सहा जणांच्यावर सातारा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बिस्मिला हॉटेलवर सातारा शहर पोलिसांनी कारवाई केल्याचे समजताच शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इतर नियम मोडणार्या हॉटेल चालकांची चांगलेच धाबे दणाणले आहेत.
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सातारा यांनी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा १९८७ हा मार्च २०२० रोजीपासून लागू केला आहे. जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार संसर्ग वाढण्यची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूचे संसर्गात वाढ होवू न देता त्यावर प्रतिबंधक उपाययोजना आखणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले आहेत. त्या आदेशामध्ये जिल्हाधिकारी यांनी पूर्ण जिह्यात आदेशातील आस्थापना व्यतिरिक्त इतर आस्थापना बंद ठेवण्याबाबत आदेश काढले आहेत.
दि. २१ रोजी रात्री आठ वाजता सदरबझार परिसरात पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पो. कॉ. संतोष कचरे, पो. शि. धुमाळ, पोलीस शि. घाडगे, भोंग हे पेट्रोलिंग करत होते. त्यांना कसाई गल्लीत सव्वा आठच्या सुमारास बिस्मिल्ला हॉटेल सुरु असल्याचे दिसले. पोलिसांनी तेथे जावून विचारणा केली हॉटेलचे मालक कोण आहेत? त्यावर तेथे असलेले जहांगिर मकदुल शेख (वय ५२, रा. सदरबझार) यांनी बिस्मिला हॉटेल माझे असल्याचे सांगितले. त्यावेळी हॉटेलमध्ये काही जण जेवण करत असताना पोलिसांना आढळून आले. त्यामध्ये अफसर अहमद बेफारी (वय ५०), शाहीद हुसेन सौदागर (वय ३०), आसिफ बाबूलाल कुरेशी (वय ३६), जहाँगिर पिर महमद (वय २६), जहाँगिर चाँदसाब शेख (वय ४८), शब्बीर कमरुद्दीन जमादार (वय ३३, सर्व रा.सदरबझार) असे सांगितले. बिस्मिला हॉटेल सुरु ठेवून पार्सलची सुविधा सुरु असताना हॉटेलमध्ये लोकांना बसवून जेवण सुरु होते. भा.द.वि.स.१८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ब महाराष्ट्र कोविड १९ अधिसुचनाचा नियम, साथरोग प्रतिबंधक अधिनियम १८९७ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.