वार्ताहर/ सातार्डा
सातार्डा विभागासाठी तलाठी नसल्याने गैरसोय निर्माण झाली आहे. सातार्डा विभाग महसुलीदृष्टय़ा विस्ताराने मोठा असून या विभागासाठी कायमस्वरुपी तलाठय़ाची गरज आहे. त्यामुळे तात्काळ कायमस्वरुपी तलाठी देण्यात यावा, अशी मागणी सातार्डा विभाग युवा सेनेने केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सावंतवाडी तहसीलदारांना दिले आहे.
या निवेदनात युवा सेनेने म्हटले आहे की, कायमस्वरुपी तलाठी नसल्याने मोठय़ा गैरसोयीला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. शासकीय कामे, शैक्षणिक कामे, वैद्यकीय कामे लागणारे दाखले ठराविक वेळेत न मिळाल्याने लोकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतीकर्ज व शेतीसंदर्भात कुठच्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे 7-12, उतारा हवा असल्यास तो हव्या त्या ठराविक वेळी मिळत नाही. सदर तात्युर्त्या स्वरुपात नियुक्त असणारे तलाठी हजर होईपर्यंत वाट पाहवी लागत आहे. त्यामुळे सातार्डा सोडून इतर गावातून येणाऱया शेतकऱयांना नाहक ये-जा करण्यासाठी आर्थिक भुर्दंड पडत आहे. या निवेदनाची गांभिर्याने दखल घेऊन तात्काळ तलाठी सजा सातार्डा येथे कायमस्वरुपी तलाठी मिळण्याची पूर्तता करावी, अशी मागणी निवेदनद्वारे करण्यात आली आहे. यावेळी आरोंदा विभागीय युवा सेना अध्यक्ष योगेश गोवेकर, कवठणी शाखाप्रमुख यामेश्वर कवठणकर, उदय पारिपत्ये, सुधा कवठणकर, संदेश कवठणकर, योगेश गोवेकर, महेश मांजरेकर, साधना कळंगुटकर, शुभांगी झारापकर आदी उपस्थित होत्या.