प्रतिनिधी/ सातारा
एसटी कर्मचाऱयांच्या सर्व संघटना एक झाल्या असून सातारा जिह्यात 11 आगारात आठव्या दिवशी सोमवारी संप सुरु होता. सर्वच आगारातील कर्मचारी वेगवेगळय़ा स्वरुपात आंदोलनात सहभागी झालेले असताना सातारा आगारात दुपारी पोलीस बळाचा वापर करत खाजगी शिवशाही बस स्वारगेटच्या दिशेने रवाना केली. आगारप्रमुख रेश्मा गाडेकर यांच्यावरही शासनापातळीवरुन दबाव आणल्याने त्यांनी पवार नामक वाहकाकरवी शिवशाही बस पुण्याकडे रवाना केली. यावेळी आंदोलक, पोलीस तसेच एस. टी. प्रशासन यामध्ये वादावादी झाली होती. बस आगारातून बाहेर पडल्यानंतर वातावरण शांत झाले.
सातारा विभागामध्ये 11 आगारामध्ये चालक, वाहक, तांत्रिक कर्मचाऱयांसह लिपीकवर्गीय कर्मचारीही संपात सहभागी आहेत. संपाचा सोमवारी आठवा दिवस होता. सकाळपासून जिह्यातील प्रत्येक आगारात वेगवेगळय़ा स्वरुपाची आंदोलने सुरु होती. सातारा आगारातील एसटी कर्मचारी हे मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीकरता सातारा विभागातील कर्मचाऱयांच्यावतीने गेलेले होते. सातारा आगारात सकाळपासून सर्वच एसटी बसेस थांबलेल्या होत्या. एसटीचे कर्मचारी मुंबईतल्या घडामोडीवर लक्ष ठेवून होते. तर दुपारी सातारा शहर पोलिसांचा ताफा आला अन् अचानक पोलिसांनी खाजगी शिवशाही बाहेर काढण्यासाठी चालकास फर्मावले. त्यासोबत वाहक देण्यासाठी एसटीच्या आगारप्रमुख रेश्मा गाडेकर यांच्यावर दबाव आणण्यात आला. त्यांच्या अगोदरच सातारा आगारातील तऱहेवाईक वाहक म्हणून ख्याती असलेल्या पवार यांनी कोणाचेही काही न ऐकता सरळ त्या बसमध्ये जावून चढले. पोलिसांनी बंदोबस्तात मोकळीच बस बाहेर काढली. आगारात मोठय़ा संख्येने पोलीस आल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण होते.
रेश्मा गाडेकर यांच्यासह अधिकाऱयांवर दबाव
सातारा आगाराच्या आगारप्रमुख रेश्मा गाडेकर यांच्यासह विभागातील अधिकाऱयांवर दबाव असून शासन पातळीवरुन हा संप मोडीत काढण्यासाठी दबावतंत्र वापरण्याकरता फोनाफोनी सुरु आहे. त्यामुळे रेश्मा गाडेकर या अननोन फोनला वैतागलेल्या आहेत. तर विभागीय नियंत्रक सागर पळसुले यांनी तर फोन उचलणेच बंद केले आहे. दरम्यान, रेश्मा गाडेकर यांच्याशी संपर्क साधला असता स्वारगेटला एसटी पाठवण्यात आली आहे. खाजगी बस आहे. खाजगी चालक संपात सहभागी नव्हते त्यामुळे त्यांनी बस बाहेर काढली असे त्यांनी सांगितले.
सातारा आगारातील कर्मचाऱयांची सुनावणीला हजेरी
मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी एसटी कर्मचाऱयांच्यावतीने सुनावणी पार पडली. त्या सुनावणीकरता सातारा आगारातील एसटी कर्मचाऱयांनी हजेरी लावली. ऍड. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱयांवतीने बाजू मांडली. दि. 20 रोजी पुढील सुनावणी आहे.