सातारा / प्रतिनिधी :
जिल्हाधिकाऱयांनी दिलेल्या नियमांची पायमल्ली करत सातारा शहरातील दोन दारुची दुकाने सुरु असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर शाहुपूरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये सरोज वाईन शॉपचे मालक राजवर्धन मनोजकुमार वाडकर(वय26, रा. तांदूळआळी), राधिका वाईनशॉपचे मालक चारुदत्त सुभाष बागल अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओकांर यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नियम मोडणाऱयांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिलेले आहेत. त्यानुसार दि.9 रोजी शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या आदेशानुसार ओकांर यादव, माने, फडतरे हे पेट्रोलिंग करत असताना मोती चौक तांदूळ आळी येथे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अविनाश चव्हाण, गणेश घाडगे आले. सर्वजण दुपारी 1 वाजता तपासणी करत असताना तेथील सरोज वाईन शॉप आणि राधिका वाईन शॉप ही दोन्ही दारुची दुकाने सुरु असल्याची दिसले. दोन्ही दुकानांचे मालक हे ग्राहकांना दारु विक्री करताना आढळून आले. त्यांना पोलिसांनी विचारले की जिल्हाधिकाऱयांचा ग्राहकांना दारु घरपोहच करण्याचा आदेश आहे. तरी तुम्ही दारु विक्री कसे करता त्यावरुन त्या दुकानाचे मालक राजवर्धन वाडकर, चारुदत्त बागल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शाहुपूरी पोलिस तपास करत आहेत.