4 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत
प्रतिनिधी / सातारा :
साताऱ्यातील एका अट्टल चोरट्याला 4 लाख 80 हजार रुपयांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली. तालुका पोलिसांच्या डीबी पथकाने ही कारवाई केली.
लोकेश रावसाहेब सुतार (वय 27, रा.लिंगणुर ता.मिरज जि.सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दिलीप दत्तात्रय भोसले यांनी तक्रार दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यानजीकच्या सैदापूर येथे आरोपीने 30 मार्च 2021 रोजी एका बंद घराचे कुलूप तोडून 4 लाख 82 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या चोरीच्या तपासादरम्यान तालुका पोलिसांच्या डीबी पथकाने दोन संशयितांना अटक करुन त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केलेली होती. त्यांचा अन्य एक साथीदार फरार होता. त्याला 7 जुलैला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्यावर यापूर्वी सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि कर्नाटकात 25 हून जास्त गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. संबंधित आरोपी घरफोडी करण्यात सराईत असून, त्याच्याकडून 4 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.