प्रतिनिधी / सातारा :
सातारा नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्यापासून शायनिंग सातारा, इनोव्हेटिव्ह साताऱ्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या जे काही घडतयं ते यांच्यामुळेच अगदी साताऱ्याला ऑक्सिजनही हेच देतात, अशी बोचरी टीका आमदार शिवेंद्रराजे यांनी खा. श्री. छ. उदयनराजे यांच्यावर केली.
सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या दालनात शिवेंद्रराजे यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नाला राजकीयदृष्टया चपखल उत्तरे दिली. ते पुढे म्हणाले, काहीजण आपणच सर्व काही करत असल्याच्या भ्रमात आहेत. अगदी साताऱ्याला जो ऑक्सीजन मिळतो तो यांच्यामुळेच असा थेट हल्लाबोल शिवेंद्रराजे यांनी अगदी उदयनराजे स्टाईलने चुटकी वाजवत केला.
महिनो महिने गायब असणारे पालिका निवडणुकीच्या तोंडावर नवा सातारा घडवू असे म्हणतात. जे काही करतात ते हेच, बाकीचे कोणी काहीच करत नाही. त्यामुळे ज्यांनी कधी जिल्हा बँकेत अगदी निवडणुकीच्या तोंडावर पाऊल टाकले ते सभासद हिताचा काय निर्णय घेणार? बँकेचे प्रोसेडिंग तपासले तर यांची उपस्थिती आणि यांचे रजेचे अर्ज हे सर्वच समोर येईल.
ज्यांनी सहकारी संस्था मोडकळीस काढल्या त्यांनी अर्ज माघारी घ्यावे, असे आव्हान उदयनराजे यांनी दिले होते त्यावर बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले, त्या संस्थेच्या निवडणुकीला त्यांनी येऊन बोलावे. जिल्हा बँक चांगली चालली आहे याची कबुली स्वतः उदयनराजे यांनीच दिली. त्यामुळे मोडकळीस आलेल्या संस्था हे विधानं जिल्हा बँकेच्या संदर्भात लागू होत नाही.
सर्वसमावेशक पॅनेलमध्ये उदयनराजे असणार का? व त्यांच्या नावाचा तुम्ही आग्रह धरणार का? या प्रश्नावर शिवेंद्रराजे म्हणाले, मुळात जिल्हा बँकेत पक्षीय पॅनेल नाही आणि राष्ट्रवादीच्या पॅनेलमध्ये मी आहे की नाही हेच मला माहित नाही. रामराजे नाईक निंबाळकर हे जिल्हयाचे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते व विधान परिषदेचे सभापती आहेत. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या वरिष्ठ नेत्यांकडून काय तो अंतिम निर्णय होईल. त्यावर मी बोलू शकत नाही, असेही शिवेंद्रराजे म्हणाले.