लोकप्रतिनिधी स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात दंग
सातारा / प्रतिनिधी :
आमदार निलेश लंके यांनी त्यांच्या मतदार संघातल्या कोरोनाबाधित रुग्णांनाच नाही तर बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या रुग्णांनाही सेवा दिली. त्याच अनुषंगाने सातारा जिल्ह्यात बैठकीसाठी आलेल्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसमोर पत्रकारांनी प्रश्न केला, तो साताऱ्यात निलेश लंके कोण होणार?, याच प्रश्नांवरुन आमदार आता स्वतःचीच पाठ थोपटून घेवू लागल्याचे चित्र आहे. तर त्यांचे विरोधक त्यांनी केलेला दावा कसा फोल हे दाखवून देत आहेत. एकमेकांची उणीदुणी काढण्याचा कार्यक्रम सुरु झालेला आहे. अजितदादांच्या दौऱ्यानंतर राजकीय खिचडीचा कार्यक्रम जोरात सुरु आहे.
सातारा जिल्ह्यात ज्या प्रमाणात लोकप्रतिनिधींकडून कामे व्हायला हवी आहेत ती होताना दिसत नाहीत. म्हणूनच पत्रकारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांना साताऱ्याचे आमदार नीलेश लंके कोण? असा प्रश्न छेडला होता. त्याच प्रश्नांवरुन सातारा जिल्ह्यात सध्या वादळ सुरु झाले आहे. हे वादळ प्रत्येक मतदार संघात घोंघावते आहे. आठही विधानसभा मतदार संघातील आमदार हे आपण किती काम केले हे दाखवून देत आहेत. प्रत्यक्षात विरोधकच त्यांची सोशल मीडियावर भांडाफोड करताना दिसत आहेत. त्यामध्ये कोणताही मतदार संघ यातून सुटलेला नाही. सातारा-जावली किंवा वाई खंडाळा महाबळेश्वर असेल, फलटण, माण-खटाव असेल, कोरेगाव असेल किंवा पाटण, कराड दक्षिण असेल. अगदी मंत्र्यांच्याही मतदार संघातील विरोधकांकडून सोशल मीडियावर टीप्पणी सुरु झाली आहे.
लोकप्रतिनिधी काय सांगताहेत आणि खरी वस्तुस्थिती काय हे दाखवले जात आहे. त्यामुळे कोरोना काळात जिल्ह्यात आमदार निलेश लंके कोण बनणार याचीच चढाओढ सुरु आहे. परंतु, अद्यापपर्यंत आमदार निलेश लंके कोण आहेत हे मात्र सापडू शकले नाही. आरोप प्रत्यारोप मात्र चांगलेच गाजू लागले आहेत. अजितदादांच्या दौऱ्यानंतर ही वस्तुस्थिती निर्माण झाली आहे.