जंबो हॉस्पिटल होऊ लागले हाऊसफुल्ल
विशाल कदम / सातारा :
सातारा जिल्ह्यात दररोज आठशेहून अधिक बाधित रुग्ण आढळून येत आहेत. बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी नातेवाईक बेडची शोधाशोध करत आहेत. मात्र, जिल्ह्यात बेडच शिल्लक नाहीत, अशी अवस्था झाली आहे. आरोग्य विभागाच्यावतीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नव्याने चार ठिकाणी बेड वाढवण्याचा प्रस्ताव त्यांनी शासनाला पाठवला आहे. त्यामुळे बेडची समस्या काही दिवसांत सुटणार आहे. सध्या होम आयसोलेशनवर जास्त भर दिला जात आहे.
कोरोनाची दुसरी लाट सध्या जिल्ह्यात खैंदूळ माजवत आहे. सातारा, कराड या दोन्ही तालुक्यांबरोबरच इतर तालुक्यामध्ये बाधित रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. त्यांना उपचार देण्यासाठी प्रशासनाच्यावतीने आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. आपल्या रुग्णास बेड मिळावा यासाठी नातेवाईक प्रयत्न करत आहेत. बेड कुठे मिळेल काय, यासाठी नातेवाईकाकडून खाजगी हॉस्पिट व क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाकडे पाठपुरावा करतात. त्यातच टोल फ्री नंबर 1077 हा बंदच आहे. त्यामुळे नेमके नातेवाईकांनी विचारायचे तरी कोणाला? असा प्रश्न नातेवाईकांना पडतो. सातारा जिल्ह्यात कोरोनाची दाहकता वाढत चालली आहे. त्याच प्रमाणात बेड मात्र उपलब्ध नाहीत. प्रशासनाकडून त्याकरता नेमके काय करता येईल, यासाठी दररोज अभ्यासपर बैठकांचे सत्र सुरु आहे.
बेडच्या समस्येबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आपल्या जिल्ह्यात आयसीयु बेडची कमतरता आहे. आयसीयुमध्ये 193 विथ एनटी बेड आहेत. तर विदाऊट एनटी बेड 300 आहेत. बाकी ऑक्सीजनचे बेड 1796 आहेत. बेडची कमरता भरुन काढण्यासाठी आणि कोरोना रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार होण्यासाठी 4 ठिकाणी बेड वाढवण्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात 15 बेड, जंबो हॉस्पिटलमध्ये 20 बेड, काशिळ येथील नव्याने होणाऱ्या कोरोना केअर सेंटरमध्ये 30 बेड आणि बॅडमिंटन कोर्टमध्ये 78 बेड सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे रुग्णांची सोय होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
साताऱ्यातील बेडची स्थिती
रुग्णालयात असलेल्या बेडची संख्या – भरलेले बेड
जिल्हा रुग्णालय 147-147 जंबो 287- 258, संजीवनी 32- 26, मंगलमूर्ती 27- 27, साईअमृत 36 -36, सिम्बॉसिस 30- 30, सातारा 40 -40, दिवेकर 15 -15, पुष्कर 80 -(सुरु नाही), समर्थ एमआयडी 25 -17, समर्थ सोमवार पेठ 24-12, प्रतिभा 40-34, यशवंत 30 -, श्वास 12-12, चैतन्य 35-25, राहत 19 -(सुरु झाले), कोहिनूर 30 -(प्रस्तावित), सर्वोदय महागाव 100- 41