प्रतिनिधी / सातारा
सातारा शहर कंटेंटमेंट झोनमध्ये आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोनाच्या अनुषंगाने कडक सूचना दिल्या आहेत. तरीही शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामाचा गोट येथे भाजी विक्री करणारा विक्रेता, विठोबाचा नळ येथे मेडिकल सुरू ठेवून औषध देणारा मेडिकलवाला यांच्यासह विनापरवाना अहमदनगर येथून आलेला एकजण अशा तीन जणावर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि.6रोजी सायंकाळी 6.30वाजता शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत हवालदार धनंजय कुंभार, चव्हाण पेट्रोलिंग करत होते.तत्पुर्वी सपोनि विशाल वायकर यांना स्थानिक नागरिकांनी फोन करून 40 रामाचा गोट सातारा येथे एक जण भाजी विकत असल्याचे सांगितले. त्यानुसार सपोनि वायकर यांनी त्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथक तेथे पोहचले. 40 रामाचा गोट येथील दक्षिण मुखी मारुती मंदिराच्या ठिकाणी 6.45वाजण्याच्या सुमारास पथकास एक जण भाजी विक्री करत असल्याचे निदर्शनास आले.त्यास पोलिसांनी नाव विचारले असता राजेश खाशाबा मोरे (वय 50, रा. 39 रामाचा गोट सातारा)असे सांगितले.जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी भा.द.वि.स.188,269,270 नुसार व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच दि.6रोजी सायंकाळी 6.30वाजता फोन सपोनि वायकर यांना आला विठोबाचा नळ येथील कमलेश मेडिकल हे सुरू आहे.त्यानुसार पोलीस तेथे गेले असता पावणे आठ वाजता मेडिकल उघडे ठेवून नागरिकांना औषधें देण्याचे काम सुरू होते. ग्राहकांनी तोंडाला मास्क लावले नव्हते.ही बाब पथकातील पोलीस नाईक धनंजय कुंभार यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी मेडिकल मालकास विचारले. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने धीरज चंद्रकांत भोईटे (वय39, रा.144मंगळवार पेठ सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच शाहूपुरी येथील गंगासागर कॉलनी आझादनगर येथे हवालदार विश्वनाथ मेचकर हे दि.6रोजी दुपारी 1 वाजता गस्त घालत होते. त्यावेळी तेथील नागरिकांनी सांगितले की दि.५रोजी सायंकाळी 6.30 वाजता अहमदनगर जिल्ह्यातून एक जण गंगासागर कॉलनीत आला आहे.त्याचा शोध घेतला असता रामदास गोविंद पवार(वय 43, सध्या रा.अहमदनगर, मूळ रा.गंगा सागर कॉलनी सातारा) असे नाव समजले.त्यास विचारले असता त्याने सांगितले की अहमदनगर येथे व्यवसाय निमित्त दि.11मार्च ला गेलो होतो.इलेक्ट्रिकचे काम संपवून दि.5मे रोजी सकाळी 10 वाजता अहमदनगर येथून दुचाकी क्रमांक एम पी 48 एम क्यू 1175 वरून निघून सायंकाळी साताऱ्यात 6.30 वाजता पोहचलो.त्यावर पोलिसांनी प्रवासाची परवानगी घेतली आहे का विचारणा केली असता नाही असे सांगितले. त्यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.शाहूपुरी पोलीस तपास करत आहेत.