पणजी प्रतिनिधी
विविध प्रकारचे उत्सवांगभूत विषय आपल्या संस्कृतीत आहेत. भगवान श्री दत्तप्रभू या भूतलावर अवतरीत झाले तो हा दिवस आपण दत्तजयंती उत्सव म्हणून साजरा करतो. भगवान श्रीदत्त हे परब्रह्म आहे. साधकांसाठी निर्विकार ईश्वरी तत्व समजणे थोडसं कठीण आहे. ईश्वर हा विषय सर्वांना समजावा, अनुभव यावा यासाठी या सगुण साकार रुपात देव अवतरीत झाले. भक्तांना सगुण साकार रुपाची ओढ निर्माण व्हावी म्हणून ज्या प्रकारे दूध बालकांसाठी पूर्णान्न आहे, तसं सद्गुरु या सगुण साकार रूपामध्ये साधकांना दर्शन देतात, असे संबोधन श्रीदत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी आशीर्वचनपर केले.
श्री दत्त पद्मनाभ पीठ, श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर श्रीदत्त जयंती महोत्सवानिमित्त श्रीदत्त भिक्षा तथा राजोपचार महापूजा उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी पूज्य स्वामीजी संबोधित करीत होते.
ज्याप्रकारे दत्तप्रभूंकडे सात्वीक गाय आहे, त्या गाईप्रमाणे आपण सात्वीक बनलं पाहिजे. गाय हे आपलं दैवत आहे. गोव्याला गाईचं नाव प्राप्त आहे. गाईकडून सात्त्वीकता घ्यावी. आपल्या धर्माविरुद्ध, देशाविरुद्ध जर कोणी काही करत असेल तर गप्प राहायचं नाही, जागृत राहावे. हा बोध आपण या गोमातेकडून घ्यावा. दत्त महाराजांची, सद्गुरुंची सेवा करून सात्त्वीकता वाढवा आणि ईश्वरी तत्वाचा अनुभव घ्या, असेही पूज्य स्वामीजींनी संबोधित केले.
सकाळच्या सत्रात वैदिक गुरुकुल ब्रह्मवृदांच्या पौरोहित्याखाली यजमान सौ. व श्री. नारायण नाईक यांच्या यजमानपदाखाली श्रीदत्त महायाग तथा श्रीदत्त भिक्षा समर्पण विधी संपन्न झाला.
राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी समाधी मंदिरात महापूजा, सद्गुरुंच्या समाधी स्थानी महाभिषेक, श्रीदत्त मंदिरात रुद्राभिषेक व महापूजा संपन्न झाली. तद्न?तर पूज्य स्वामीजींच्या पावन सान्नध्यात दत्तभिक्षा समर्पण विधी, पूर्णाहुती, श्रीदत्त महाआरती, दर्शन व महाप्रसादाने सकाळच्या सत्राची सांगता झाली.
संध्याकाळच्या सत्रात श्रीदत्त महाराजांचा जन्मोत्सव राजोपचार महापूजेने वेदमंत्रांच्या उद्घोषात, विविध कला, विद्या, शास्त्र, पुराण, काळ, मृदंग, शंख, घंटा, नगारे, नृत्य यांसारख्या कलांनी तपोभूमी दुमदुमली. श्रीदत्तनामाच्या गजरात, टाळमृदुंगांच्या उद्घोषात मिरवणूकीद्वारे पालखी उत्सव उत्साहात साजरा झाला.
पुढे पूज्य स्वामीजींचे दिव्य आशीर्वचन, महाआरती, दर्शन व महाप्रसादाने श्रीदत्त जयंती महोत्सवाची सांगता झाली. या सोहळय़ास श्री दत्त पद्मनाभ पीठाचे संचालक मंडळ, कृपाकांक्षी आदी उपस्थित होते.