मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन. डिचोली नगरपालिकेचे कौतुकास्पद कार्य. स्थनिकांना आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग व्हावा. डिचोली बाजारातील मार्केट प्रकल्पाचे उदघाटन.
डिचोली / प्रतिनिधी
डिचोली नगरपालिकेने डिचोली शहराच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. आपल्या क्षमतेप्रमाणे डिचोलीच विकास साधताना इतरही नगरपालिकांच्या समोर एकसंध राहून कशा प्रकारे सकारात्मक विकास साधता येतो याचे ज्वलंत उदाहरण ठेवले आहे. मात्र आजच्या परिस्थितीत केवळ साधनसुविधा उपलब्ध करून देऊन विकास साधल्याचे समाधान मानणे गैर ठरणार असून स्थनिक लोकांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी सरकारी प्रकल्पांचा आधार मिळावा यासाठी प्रत्येक नगरपालिका, पंचायत, लोकप्रतिनिधी यांनी प्रयत्न करावेत. आपल्याकडे पूर्व परंपरेनुसार असलेल्या धंदे व्यवसाय यांना पुनर्जीवित करून त्याद्वारे लोकांच्या आवश्यकता पूर्ण करताना स्वतःच्या अर्थार्जनावर भर द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोली येथे केले.
डिचोली बाजारात गोवा राज्य नगर विकास एजंसीमार्फत उभारण्यात आलेल्या डिचोली नगरपालिकेच्या मार्केट प्रकल्प चार या इमारतीचे उदघाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सभापती राजेश पाटणेकर, डिचोलीचे नगराध्यक्ष सतीश गावकर, उपनगराध्यक्ष कुंदन फळारी, नगरसेवक अजीत बिर्जे, गुरूदत्त पळ, रामा नाईक, विजयकुमार नाटेकर, सुदन गोवेकर, तनुजा गावकर, सुखदा तेली, चैतन्या तेली, मेधा बोर्डेकर, पालिका मुख्य अभियंता मुजावर शहा मुन्ना, नगरनियोजन खात्याचे संचालक तारीक थोमस, सुडाचे मुख्य प्रकल्प अधिकारी विजयकुमार होनावड, पालिका मुख्याधिकारी दिपक वायंगणकर आदींची उपस्थिती होती.
कोवीडच्या परिस्थितीतून बोध घ्यावा.
देशाबरोबरच गोव्यावर कोसळलेल्या कोवीड परिस्थतीने आज लोकांना खुप काही शिकविले आहे. आज गोमंतकीय लोक हळूहळू व्यवसायात येत आहेत. आपल्याकडे असलेल्या कौशल्याचा कशा प्रकारे वापर करता येणार आणि त्यातून आपला व्यवसाय कसा वाढणार यावर सखोल अभ्यास करणे काळाची गरज आहे. विपेत म्हणून आज सरकारदरबारी नोंद असलेल्या विपेत्यांना आवश्यकतेप्रमाणे 10 हजारचे कर्ज कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेतून कमी व्याजदरावर देण्याची योजना अंमलात येत असून आता लहान लहान व्यवसायिकांना “कोपरी” तून ज्यादा व्याजदरावर कर्जे घेण्याची गरज नाही. असेही यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले.
डिचोलीचे लोकप्रतिनिधी आणि विकासही तुपाशीच.
“डिचोलीचे लोकप्रतिनिधी तुपाशी आणि विकास उपाशी” अशी टिप्पणी कोणीतरी फेसबुकवर डिचोलीच्या विकासाबाबतीत केली होती. परंतु आज डिचोली शहर परिसर आण मतदारसंघातील ग्रामीण भागातीलही विकासाला मोठी गती मिळाली आहे. डिचोली शहरात अनेक विकास प्रकल्प सुरू असून येणाऱया काळात सदर सर्व प्रकल्प पूर्णत्वास येणार आहेत. त्यामुळे “डिचोलीचे लोकप्रतिनिधी तुपाशी आणि विकासही तुपाशीच” आहेत. याच विकासाच्या जोरावर डिचोलीत आम्ही लोकांसमोर जाणार आणि येणाऱया नगरपालिका निवडणूकीत सर्व बाराही जागा जिंकणार असा विश्वास यावेळी सभापती राजेश पाटणेकर यांनी व्यक्त केला. केवळ नवीन बसस्थानकाची फाईल आर्थिक पातळीवर अडकलेली असून मुख्यमंत्र्यांनी याही प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद करून हा प्रकल्पही मार्गी लावावा अशी मागणीही यावेळी सभापती पाटणेकर यांनी केली.
डिचोलीतील जनतेच्या सहकार्याने विकासकामांना यश.
डिचोली नगरपालिका क्षेत्रातील विकासाची आतापर्यंत सरकारने कधीच उपेक्षा केली नाही. सदैव विकासाच्या मागणीला भरभरून दिले आहे. त्याच जोरावर आज डिचोलीत नगरपालिकेने अनेक प्रकल्प साकारण्यात यश मिळविले आहे. सरकारबरोबरच या सकारात्मक विकासात आम्हाला सदैव डिचोलीच्या जनतेची मोलाची साथ लाभली. त्यामुळेच ह सर्व प्रकल्प आम्ही पूर्ण करू शकलो. याच विकासाच्या जोरावर आणि जनतेच्या पाठिंब्यावर येणाऱया नगरपालिका निवडणुकीत आम्ही पुन्हा या पालिकेवर आमचेच मंडळ निवडून आणणार, असे प्रतिपादन नगराध्यक्ष सतीश गावकर यांनी यावेळी केले.
स्वागत नगरसेवक अजीत बिर्जे यांनी केले. फित कापून, कोनशीला अनावरण करून व समई प्रज्वलित करून या बहुउद्देशीय मार्केट प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. सूत्रसंचालन राजन कडकडे यांनी केले तर आभार उपनगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी मानले.