प्रतिनिधी / पणजी
देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाऊन असताना गोव्यात मात्र 20 एप्रिलपासून त्यात सूट दिल्यानंतर ‘सामाजिक अंतर’ या महत्त्वाच्या मार्गदर्शक तत्वाला हरताळ फासला जात असल्याचे समोर येत आहे. सार्वजनिक जागेत हे ‘अंतर’ राखणे कसेच शक्य नाही हे माहित असतानाही गोव्यात सार्वजनिक सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यात लोकांची- कर्मचारी, कामगार यांची चूक म्हणता येणार नाही. सरकारने कार्यालये इतर सेवा सुरू केल्याने लोकांना यावे लागले. त्यातून सामाजिक अंतराचे भान कोणाला रहात नाही आणि ते राखणेही शक्य नाही हे स्पष्ट झाले आहे.
सरकारने सरकारी कार्यालये सुरू करण्यासाठी कदंबच्या बसगाडय़ा चालू केल्या? बसगाडीत सामाजिक अंतर राखणे कसेच शक्य नाही. एका पूर्ण आसनावर एक जण जरी बसला तरी चढताना उतरताना हे अंतर पाळणे कठीण आहे. पणजी बसस्थानकावर देखील अनेक कर्मचारी कदंब बसची प्रतीक्षा करत असताना हे अंतर राखले जात नाही. बस आली की त्यात चढण्यासाठी गर्दी होते तेव्हा सामाजिक अंतराचे भान राखणे शक्य होत नाही. त्यामुळे एक मीटरच्या सामाजिक अंतराच्या तत्त्वाला हरताळ फासला गेल्याचे उघड झाले आहे.
सरकारने कर्मचाऱयांच्या सोयीसाठी फेरी बोट सेवा चालू केली असून तेथे तर अंतर राखणार की दुचाकी वाहने सांभाळणार? असा प्रश्न आहे. फेरीबोटीत वाहने घालताना गर्दी तसेच ती काढतानाही वाहनचालकांची गर्दी होत असल्याने तेथेही सामाजिक अंतराचे तत्त्व ‘फेल’ गेले आहे. मुळात या अंतराच्या तत्त्वावर देखरेख करणे शक्य नाही. काही माणसे ते अंतर पाळतील परंतु सर्वजण ते पाळतीलच असे नाही. त्यामुळे हा अंतराचा मुद्दा आता तेवढा गंभीरतेने घेतला जात नाही आणि तो मागे पडला असल्याचे चित्र दिसून येते. काही बँकांमध्ये ते पालन होताना दिसते परंतु इतर ठिकाणी मात्र ते अंतर पाळणे शक्य नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
दुचाकीवर मागील व्यक्तीने हेल्मेट घातले तर दोघांना अनुमती देण्यात आली आहे. तेथे कुठे आले आहे सामाजिक अंतर? शहरात एखादे दुकान उघडले तर तेथे खरेदीसाठी गर्दी पडते. गावात मासळी विक्रीसाठी आली की तेथेही गर्दी होते. तेव्हा सामाजिक अंतराचे भान कोणालाच रहात नाही हे दिसून आले आहे. त्यामुळे सदर तत्त्वाला लोक फारशी किंमत देत नाहीत आणि ते गंभीरतेने घेत नाहीत हे स्पष्टपणे दिसून येत आहे. एकंदरीत या लॉकडाऊनलाच लोक विटले असल्याचे चित्र आहे. थोडीशी सूट मिळताच अनेकजण आपापली वाहने घेवून रस्त्यावर आल्याचे चित्र गेल्या दोन दिवसापासून पहायला मिळत आहे.