प्रतिनिधी / बेळगाव
मागील वर्षभरापासून बंद असलेले सामान्य तिकीट काऊंटर पुन्हा एकदा सेवेत कार्यरत होणार आहे. पॅसेंजर सुरू करण्याचा निर्णय नैर्त्रुत्य रेल्वेने घेतल्याने सामान्य तिकीट काऊंटरही खुले केले जाणार आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांना तिकीट मिळण्याची सोय होणार आहे. याचा फायदा हुबळी ते शेडबाळदरम्यान प्रवास करणाऱया प्रवाशांना होणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मार्च 2020 पासून पॅसेंजरसोबत लांब पल्ल्याच्या गाडय़ा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे रेल्वे स्थानकावर असणारे सामान्य तिकीट काऊंटर बंद करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर लांब पल्ल्याच्या गाडय़ा सुरू करण्यात आल्या. परंतु गर्दी रोखण्यासाठी एक दिवस आधी रेल्वेचे बुकिंग करावे लागत होते. यासाठी रिझर्वेशन काऊंटरवर जाऊन तिकीट बुकींग करावे लागत होते. यामुळे बेळगाव, मिरज, लोंढा, शेडबाळ, कुडची, हुबळी, गोकाक, घटप्रभा असा प्रवास करणाऱयांना रिझर्वेशनशिवाय पर्याय नव्हता. यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत होती.
नैर्त्रुत्य रेल्वेने दोन दिवसांपूर्वी हुबळी-शेडबाळ व बेळगाव-शेडबाळ अशा पॅसेंजर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार दि. 10 पासून या पॅसेंजर सुरू केल्या जाणार आहेत. या पॅसेंजर रेल्वेंच्या तिकिटांसाठी वर्षभरापासून बंद असलेले तिकीट काऊंटर पुन्हा एकदा सुरू केले जाणार आहे. यामुळे ज्यांना तात्काळ प्रवास करायचा आहे त्यांना वेळेत तिकीट काढता येणार आहे.
रेल्वे प्रवाशांची होणार सोय
सामान्य तिकीट काऊंटर सुरू केल्यामुळे प्रवाशांना तात्काळ तिकीट खरेदी करता येणार आहे. यामुळे लेंढा, खानापूर, गोकाक, घटप्रभा, कुडची, रायबाग, शेडबाळ या ठिकाणी प्रवास करणाऱयांना आता सोयीचे होणार आहे. वर्षभरानंतर प्रवाशांची होणारी कसरत काही प्रमाणात का होईना थांबणार असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.