मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : तेई तेजु यिंग, कॅरोलिना मारिनची सहज विजयासह उपांत्य फेरीत धडक
वृत्तसंस्था/ क्वालालम्पूर
मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताला शुक्रवारी दुहेरी धक्का बसला. दिग्गज बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू व सायना नेहवालला उपांत्यपूर्व फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह भारताचे या स्पर्धेतील आव्हान देखील संपुष्टात आले आहे.
शुक्रवारी झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात जागतिक क्रमवारीत 11 व्या स्थानी असलेल्या सायना नेहवालला स्पेनची दिग्गज कॅरोलिना मारिनने 8-21, 7-21 असे एकतर्फी पराभूत केले. सुरुवातीपासून आक्रमक खेळणाऱया कॅरोलिनाने सामन्यावर वर्चस्व गाजवताना सायनाला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. सायना पहिल्याच गेमपासून अत्यंत हतबल दिसत होती. पहिला गेम 8-21 असा गमावल्यानंतर दुसऱया गेममध्ये तरी सायनाकडून प्रतिकार पाहायला मिळेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती, पण सायनाला फारसा प्रहार करणे जमले नाही. मारिनने दुसरा गेम 7-21 असा सहज जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सिंधूची पुन्हा निराशा
सायनाच्या पराभवानंतर वर्ल्ड चॅम्पियन सिंधूकडुन भारताला आशा होत्या. पण सिंधूलादेखील चिनी तैपेईची दिग्गज खेळाडू तेई तेजु यिंगने 21-16, 21-16 असे सहज नमवत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे, गतवर्षी ऑगस्टमध्ये वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धा जिंकल्यानंतर सिंधूला एकाही स्पर्धेची उपांत्य फेरी गाठता आलेली नाही. या स्पर्धेतही उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर तिच्या चेहऱयावर स्पष्ट निराशा दिसत होती.