जागतिक अर्थव्यवस्थेसमोर नवे गंभीर आव्हान : 2018 च्या तुलनेत आकडा 50 टक्क्यांनी अधिक
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
सायबर गुन्हय़ांच्या वाढत्या संख्येमुळे 2019 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेला 1 ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 73 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हा आकडा जागतिक जीडीपीच्या 1 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तर 2018 मध्ये 600 अब्ज डॉलर्सच्या नुकसानाच्या तुलनेत हे प्रमाण 50 टक्क्यांनी अधिक आहे. सायबर सुरक्षा कंपनी मॅकेफीच्या अहवालात ही आकडेवारी मांडण्यात आली आहे.
2019 मध्ये दोन-तृतीयांश कंपन्यांनी सायबर गुन्हय़ांना तोंड दिले आहे. अशा घटनांना रोखण्यासाठी कंपन्यांचा सरासरी खर्च 0.5 दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक राहिला आहे. सायबर गुन्हय़ांमध्ये आयपीची चोरी आणि आर्थिक गुन्हय़ांची 75 टक्के हिस्सेदारी राहिली आहे. कंपन्यांसाठी या घटना सर्वाधिक आव्हानात्मक राहिल्या आहेत. मॅकेफीने सेंटर फॉर स्ट्रटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजसोबत (सीएसआयएस) मिळून सायबर गुन्हय़ांसंबंधीचा हा अहवाल तयार केला आहे.
प्रतिबंधात्मक योजनेचा अभाव
कंपन्यांना झालेल्या नुकसानीत डाउनटाइम, ब्रँडची प्रतिष्ठा आणि कार्यदक्षतेतील घटही सामील आहे. सायबर गुन्हे रोखणे आणि प्रत्युत्तरादाखल व्यक्त होण्याची कुठलीच योजना नसल्याचे सर्वेक्षणात सामील 56 टक्के कंपन्यांनी मान्य केले आहे. सर्वेक्षणात सामील 951 कंपन्यांकडे प्रत्युत्तरादाखल योजना असून यातील केवळ 32 टक्के कंपन्यांनी ही योजना प्रभावी असल्याचे मानले आहे.
सिस्टीम डाउनटाइमचा अनुभव
सायबर गुन्हय़ानंतर सिस्टीम डाउनटाइम हा सार्वत्रिक अनुभव राहिल्याचे सर्वेक्षणात सामील दोन-तृतीयांश कंपन्यांचे मानणे आहे. 2019 मध्ये डाउनटाइममुळे कंपन्यांचा सरासरी खर्च 7,62,231 डॉलर्स राहिला आहे. हा अहवाल 1500 माहिती-तंत्रज्ञान आणि उद्योगविषयक निर्णय घेणाऱया व्यक्तींच्या ऑनलाईन मुलाखतीच्या आधारावर तयार करण्यात आला आहे. आयटी सुरक्षेच्या घटनांमुळे सिस्टीम डाउनटाइमचा सरासरी खर्च 1 लाख ते 5 लाख डॉलर्सदरम्यान राहिल्याचे 33 टक्के जणांचे म्हणणे आहे.
कंपन्यांवरील अन्य प्रभाव
‘द हिडन कॉस्ट ऑफ सायबर क्राइम’ या नावाने तयार करण्यात आलेल्या या अहवालात सायबर गुन्हय़ांमुळे कंपन्यांना आर्थिक नुकसानीसह अन्य नुकसानही झाले आहे. सायबर गुन्हय़ांमुळे व्यवसायावर नकारात्मक प्रभाव पडला आहे. तसेच सायबर गुन्हय़ांच्या घटनेनंतर कामकाजाच्या वेळेचेही नुकसान झाल्याचे 92 टक्के कंपन्यांनी नमूद केले आहे.