गवळी तिठा येथे टेम्पो चालकाला केली होती मारहाण : उपचारादरम्यान झाला होता मृत्यू : अन्य अनेक गुन्हय़ांचीही नोंद
प्रतिनिधी / ओरोस:
मालवाहतूक करणारा टेम्पो अडवून चालकाला मारहाण करीत त्याच्याकडील मोबाईल हँडसेट चोरून नेल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या चंदन उर्फ सनी अनंत आडेलकर (27) आणि अक्षय अजय भिके (27, दोन्ही राहणार बारदेश-गोवा) या संशयितांना ‘मोक्का’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा) लावण्यात आला आहे. मारहाण झालेल्या अजयकुमार पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर गोवा व महाराष्ट्रात त्यांच्यावर गंभीर स्वरुपाच्या गुन्हय़ांची नोंद आहे. दरम्यान मोक्का अंतर्गत जिल्हय़ातील ही पहिलीच कारवाई असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राजद्र दाभाडे यांनी दिली.
या संशयितांवर सिंधुदुर्गसह संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात खून, बलात्कार व अन्य असे अनेक गुन्हे दाखल आहेत. सद्यस्थितीत न्यायालयीन कोठडीत असलेल्या या दोन्ही संशयितांना जिल्हा न्यायाधीश 2 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी पोलिसांच्या मागणीनुसार आठ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
12 डिसेंबर 2020 रोजी अजयकुमार श्रीपतराव पाटील (रा. हातकणंगले -कोल्हापूर) हे एम. एच. 09 ए. एम. 8582 क्रमांकाच्या टेम्पोमधून माल भरून सावंतवाडी येथे आले होते. सावंतवाडी गवळी तिठा येथे दोन्ही संशयित आरोपींनी त्यांच्या टेम्पोसमोर स्कूटर उभी करून टेम्पो अडवला. नंतर चाकूचा धाक दाखवून पैशांची मागणी केली होती. मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने दोन्ही संशयितांनी त्यांना मारहाण केल्याची तसेच त्यानंतर त्यांच्या ताब्यातील मोबाईल हँडसेट घेऊन पोबारा केल्याची तक्रार होती. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने घटना घडल्यापासून 24 तासाच्या आत संशयितांना ताब्यात घेतले होते. पाच दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयाने त्यांना 17 रोजी न्यायालयीन कोठडी मंजूर केली होती. आजही हे दोन्ही संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत.
दोघांवर अनेक गुन्हे दाखल
पोलिसांनी केलेल्या तपासात चंदन आडेलकर याच्यावर सावंतवाडी शहर व गोवा राज्यात मागील दहा वर्षांत खुनाचा एक, बलात्काराचा एक, फसवणुकीचा एक, चोरीचे पाच असे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. तर अक्षय भिके याच्यावर खुनाचा एक, फसवणुकीचा एक, अपक्रिया एक, विनयभंगाचा एक, चोरी – घरफोडीचे आठ असे एकूण बारा गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या रेकॉर्डवरून ते सराईत व संघटित टोळीतील गुन्हेगार असून वारंवार चोरी करीत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
मोक्का लावण्यास परवानगी
संशयित आरोपींवरील गंभीर स्वरुपाच्या गुन्हय़ांचे प्रमाण पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी कोकण परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते यांच्याकडे संशयित आरोपींना मोक्का लावण्याबाबतची परवानगी मागितली होती. ती देण्यात आली असून सावंतवाडी येथील पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
आठ दिवसांची पोलीस कोठडी
संशयित आरोपींनी मारहाण केलेल्या अजयकुमार पाटील यांचा उपचारादरम्यान गोव्यात बांबोळी रुग्णालयात 16 डिसेंबर 2020 रोजी मृत्यू झाला होता. त्यामुळे भादंवि कलम 302 नुसार खुनाचा आरोपही ठेवण्यात आला आहे. तर आता मोक्का लावण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाच्या पुढील तपासणीसाठी संशयित आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांकडून जिल्हा व सत्र न्यायालयाकडे करण्यात आली होती. यावरील सुनावणीत आठ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.