खासदार सुरेश प्रभू यांची ग्वाही
वार्ताहर / सावंतवाडी:
सावंतवाडी शहराच्या विकासासाठी तसेच शहरात डेनेज सिस्टिम दर्जेदार करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून दीडशे कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी नगराध्यक्ष संजू परब यांनी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभू यांच्याकडे केली. सावंतवाडी शहराच्या विकासासाठी व अंडरग्राऊंड गटार योजनेसाठी निश्चितपणे केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून भरघोस निधी उपलब्ध करून देऊ, असे प्रभू यांनी स्पष्ट केले.
प्रभू सावंतवाडी नगरपालिकेत आले होते. त्यावेळी त्यांचा सत्कार नगराध्यक्ष परब यांनी केला. यावेळी माजी आमदार राजन तेली, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणीपुरवठा सभापती उदय नाईक, ऍड. परिमल नाईक, मनोज नाईक, जयंत जावडेकर, समृध्दी विर्नोडकर, मोहिनी मडगावकर, आनंद नेवगी, दीपाली भालेकर, उमा प्रभू उपस्थित होते.
प्रभू म्हणाले, सावंतवाडी नगरपालिका पूर्वी वेगळय़ा पक्षाची होती. मी वेगळय़ा पक्षाचा होतो. तरीदेखील शहरातील जनतेच्या विकासासाठी मी निधी उपलब्ध करून दिला. आता भाजपच्या माध्यमातून या शहराचा विकास केला जाईल. नगराध्यक्ष परब हे या शहराच्या विकासासाठी चांगले काम करत आहेत त्यांनी भुयारी गटार योजनेसाठी केंद्र सरकारकडून निधीची मागणी केली आहे. त्यासाठी पाठपुरावा केला जाईल.
यावेळी नगराध्यक्ष परब यांनी सावंतवाडी शहरात सांडपाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अनेक शहरांमध्ये भूमिगत गटार योजना हाती घेण्यात आली. आपल्या शहरातही अशी योजना राबविणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठीचा खर्च नगरपालिकेला परवडणारा नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून सांडपाणी शुध्दीकरण योजना राबवण्यासाठी तसेच अंडरग्राऊंड गटार योजना राबवण्यासाठी दीडशे कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.