सावंतवाडी/प्रतिनिधी-
सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे प्रथमच जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्ट्रीमकास्ट सर्व्हिसेस प्रा. ली. व edmission सेंटर सावंतवाडी यांच्या सहकार्यातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ११ फेब्रुवारीला येथील जिमखाना मैदानावर होणार आहे. जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघांनी यात सहभाग घेण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष प्रविण मांजरेकर यांनी केले आहे.
याबाबत नियोजनाची आज बैठक येथील पालिका कक्षात पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्यांची पार पडली. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण मांजरेकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार संतोष सावंत, सचिन रेडकर, मोहन जाधव, सचिव प्रसन्न राणे, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, सदस्य उमेश सावंत, मयूर चराठकर, महादेव भिसे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील पत्रकारांना नेहमीच्या कामातून विरंगुळा मिळावा, या हेतूने सावंतवाडी पत्रकार संघाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. यासाठी आजच्या बैठकीत स्पर्धेच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व तालुका पत्रकार संघांना या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व सदस्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. स्पर्धेचे स्वरूपही निश्चित करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ११ हजार १११ व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक ५ हजार ५५५ रुपये व आकर्षक चषक तसेच इतर वैयक्तिक पारितोषिके व प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील तालुका पत्रकार संघांनी सचिन रेडकर (९४०३१९७४१९), मयूर चराटकर (९४०४९३९२९४) व प्रसन्न राणे (९४०५२७८६९३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पत्रकार संघाने केले आहे.