काँग्रेस गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा खळबळजनक आरोप
प्रतिनिधी /पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारच्या मंत्रिमंडळातील एक कॅबिनेट मंत्री ‘सेक्स स्कॅडल’मध्ये गुंतल्याचा खळबळजनक आरोप गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.
मंत्रीपदाचा गैरवापर करुन एका महिलेवर लैगिक अत्याचार व तिचे शोषण करण्यात आले असून सावंत यांच्यापर्यंत हा विषय गेल्यानंतरही ते कारवाई करण्याऐवजी मंत्र्यालाच अभय देत पाठीशी घालत असल्याची टीका चोडणकर यांनी केली आहे.
विषय पंतप्रधानांकडे नेणार
येत्या 15 दिवसात त्या मंत्र्याचे नाव जाहीर करुन कारवाई न केल्यास 19 डिसेंबर रोजी गोव्यात येणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हा विषय नेण्याचा इशाराही चोडणकर यांनी दिला आहे.
सावंत हे कमकुवत नेतृत्व
पणजीत काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत चोडणकर यांनी पुढे सांगितले की गोव्यात बलात्कार व इतर गुन्हे मोठय़ा प्रमाणात वाढले असून गुन्हेगारांना कोणाचेच भय राहिलेले नाही. डॉ. सावंत हे कमकुवत नेतृत्व असल्यामुळे गुन्हेगारांचे फावले असून त्यांना संरक्षण मिळत आहे.
वर्षभरात राज्यात 60 बलात्कार
गोवा राज्यात या संपत आलेल्या वर्षात एकुण 60 बलात्कार प्रकरणे नोंद झाली असून नोंदणी नसलेली अनेक प्रकरणे असू शकतात. त्या 60 मधील 42 प्रकरणे अल्पवयीन मुलींची होती अशी माहिती चोडणकर यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांची मुद्दामहून डोळेझाक
मंत्र्याच्या सेक्स स्कॅन्डल प्रकरणाचे व्हिडीओ, व्हॉटस्अप चॅट, ऑडियो आपण प्रत्यक्ष पाहिले असून सदर मंत्री अधिकारांचा दुरुपयोग करुन हे धंदे करीत आहे. हा सर्व तपशील डॉ. सावंत यांनी देखील पाहिला असून त्यांच्यासह सदर मंत्र्याचा एका उद्योगात वाटा असल्याने ते या प्रकरणाकडे डोळे झाक करीत असल्याचे चोडणकर यांनी नमूद केले.
पंधरा दिवसांत मंत्र्याला हटवा
हा मंत्री खरे म्हणजे आमदारही होण्याच्या लायकीचा नाही. प्रत्यक्ष शोषित महिलेचा गर्भपात करण्याचाही प्रयत्न केला. त्या मंत्र्यास 15 दिवसात मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी चोडणकर यांनी केली आहे.