चाळकेवाडी, ठोसेघर, कास परिसरात चोरटय़ांची टोळी सक्रीय
प्रतिनिधी/ सातारा
अगोदरच कधी नव्हे ते कोरोनामुळे तब्बल सात महिने सुट्टी मिळाली आहे. त्यातच दिवाळीच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी अनेकजण सातारा तालुक्यातील कास, ठोसेघर, चाळकेवाडी परिसरात जातात. पर्यटक अशा ठिकाणी जाताना आपली वाहने ठराविक ठिकाणी लावून फोटो काढण्यात मग्न असताना गाडय़ांच्या काचा फोडून गाडीतील ऐवज लांबवण्याचे प्रकार वाढले आहेत. चोरी करणाऱया टोळय़ा सक्रीय झाल्या असून पर्यटकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी लावावीत, असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, गुरुवारी चाळकेवाडीनजिक एका कारची काच फोडून ऐवज लांबवल्याची घटना घडली. या घटनेची नोंद पोलिसात झाली नव्हती.
दिवाळीची सुट्टीत झुळझुळ वाहणारे धबधबे, डोंगर कडे, धरणाचा जलाशय, जलाशयावर विहार करणारे पक्षी पहाण्यासाठी पर्यटक आर्वजून गर्दी करु लागले आहेत. अगोदरच कोरोनामुळे सुट्टी असल्याने घरात बसून वैतागलेले नागरिक आता निसर्गाच्या सानिध्यात फिरताना दिसत आहेत. सातारा तालुक्यातील कास, ठोसेघर, चाळकेवाडी या परिसरात अनेक पर्यटक आर्वजून भेट देत आहेत. आपली वाहने रस्त्याकडे कशीही उभी करुन हे पर्यटक निसर्गाच्या ठिकाणी फोटो काढण्यात मग्न असतात. अशाच वेळी चोरटे अचानक त्यांनी लावलेल्या गाडीला टार्गेट करतात. गाडीच्या काचा फोडून गाडीतील महत्वाचा ऐवज लांबवला जातो. त्यामुळे फिरायला जाणाऱया पर्यटकांनी सावधान, असेच आवाहन अनुभव आलेल्या सातारकरांनी केले आहे.
गुरुवारी एका पर्यटकास चाळकेवाडी येथे अनुभव आला. त्यांच्या कारची मागची काच फोडून गाडीतील पर्स अज्ञात चोरटय़ांनी चोरुन नेली. त्या पर्समध्ये 2100 रुपये व कागदपत्रे होती. त्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली नाही.