जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बोल्डे यांच्याकडून पहाणी
प्रतिनिधी/ चिपळूण
कोरोना बाधितांची संख्या वाढत चालल्याने आता तालुकास्तरावर कोविड सेंटर स्थापन करण्याच्या सूचना सरकारकडून दिल्या गेल्या आहेत. त्यानुसार आता चिपळूण तालुक्यासाठी 75 खाटांचे कोविड सेंटर सावर्डे येथील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात केले जाणार आहे. सोमवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी या इमारतीची पहाणी केली.
जिह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यातून आलेल्या चाकरमान्यांना क्वारंटाईन कुठे करायचे, त्यांच्यावर उपचार कसे करायचे, असे प्रश्न आरोग्य प्रशासनासमोर उभे राहिले आहेत. त्यातच आता बाधित रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. त्यामुळे तालुकास्तरावर सावर्डेलगत वहाळ फाटा येथे समाजकल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृह इमारतीत कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आमदार शेखर निकम यांनी पुढाकार घेतला आहे. सह्याद्री शिक्षण संस्थेने देणगीदाखल दिलेल्या जागेत समाजकल्याण विभागाचे मुलींचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात शंभर मुली रहात होत्या. आता हे वसतिगृह कोविड सेंटर म्हणून तयार केले जात असून याठिकाणी बाहेरून आलेल्यांची तपासणी करणे, पॉझिटिव्ह असलेल्या मात्र कोणतीही लक्षणे दिसून येत नसलेल्यांवर येथे उपचार केले जाणार आहेत.
दरम्यान, सोमवारी सकाळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बोल्डे यांनी या इमारतीची पहाणी केली. आमदार शेखर निकम यांनी त्यांचे स्वागत करत त्यांना हे वससतिगृह दाखवले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव, सावर्डेचे सरपंच सुभाष मोहिरे, डॉ. सानप, डॉ. हंकारे, अमित सुर्वे आदी उपस्थित होते. 75 खाटांच्या असलेल्या या सेंटरमध्ये आवश्यक स्टाफसह वैद्यकीय सुविधा पुरवल्या जाणार आहेत.