ऑनलाईन टीम / पुणे :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि संचेती हेल्थकेअर ॲकॅडेमी यांच्यात एक्सप्रेसिव मूव्हमेंट थेरपी या दोन वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी सामंजस्य करार करण्यात आला. हा अभ्यासक्रम आंतरविद्याशाखेअंतर्गत विध्यार्थ्यांना करता येणार असून या अभ्यासक्रमास परदेशातील व्यावसायिक तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी उपलब्ध होणार आहेत. भारतातच नव्हे तर संपूर्ण आशियात पहिल्यांदा हा अभ्यासक्रम विध्यार्थ्यांसाठी संचेती हेल्थकेअर ॲकॅडेमी यांच्या सहकार्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरु होणार आहे.
यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र- कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, डॉ. पराग काळकर, डॉ. अपूर्वा पालकर, डॉ. दिपक माने तसेच डॉ. के. एच. संचेती, संचेती हेल्थकेअर अकॅडमीची कार्यकारी संचालिका मनीषा सिंघवी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी कुलगुरू नितीन करमळकर म्हणाले, या अभ्यासक्रमातून नवीन कौशल्याची निर्मिती होऊन अनेक दुर्धर आजार तसेच विविध अपघातामध्ये मानसिकदृष्टया नैराशेने ग्रस्त झालेल्या रुग्णांना सावरण्यास या अभ्यासक्रमाचा उपयोग होईल.
संचेती हेल्थकेअर ॲकॅडेमीच्या कार्यकारी संचालिका मनीषा सिंघवी म्हणाल्या, संचेती हॉस्पिटल येथे आम्ही आमच्या रूग्णांना सर्वोत्तम उपचार देण्यावर नेहमी विश्वास ठेवला. आमच्या आधुनिक औषधोपचार पद्धतींबरोबरच आता आपल्याला सर्वांगीण उपचारांचे विज्ञान देखील मिसळायचे आहे. हा दोन वर्षांचा एक्सप्रेसिव मूव्हमेंट थेरपी कोर्स भारतात घेऊन जाणे म्हणजे त्या दिशेने फक्त एक लहान पाऊल आहे. भविष्यकाळात क्रिएटिव्ह आर्ट अॅट थेरेपीज इन हेल्थकेअरमध्ये पुढे अजून नाविन्यपूर्ण कार्य करण्याचा मानस आहे.
ह्या अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थ्यांना भविष्यात शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रात समुपदेशक, मानसोपचार तज्ञ, अनेक दुर्धर आजाराने मनाने खचलेल्याना विविध थेरपीने उपचार करण्याची संधी मिळणार आहे.