प्रतिनिधी/ दहिवडी
अतिशय दुर्दैवी घटनेत प्राण गमवावा लागलेल्या सीमा सुरक्षा दलातील जवान व कोळेवाडीचे (ता. माण) सुपुत्र हेड कॉन्स्टेबल दादासो सोपान तोरसकर (वय ः 49 वर्षे) यांना साश्रूपुर्ण डोळ्यांनी धीरगंभीर वातावरणात अंतिम निरोप देण्यात आला. वीर जवानाच्या अंत्यदर्शनासाठी कोळेवाडीत जनसमुदाय लोटला होता.
पंजाब राज्यातील अमृतसर जिह्यातील खासा येथील बी.एस.एफ.च्या मुख्यालयात 144 बी.एन. या युनिटमध्ये युनिटमधीलच सहकायाने केलेल्या गोळीबारात हेड कॉन्स्टेबल दादासो तोरसकर यांचा रविवारी मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेची माहिती समजताच कोळेवाडीकरांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कोळेवाडीसह संपुर्ण परिसरावर शोककळा पसरली. त्यानंतर सर्वांचे डोळे वीर जवान दादासो यांच्या पार्थिवाकडे लागले होते. आज मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास पार्थिव गावात आल्यानंतर कुटूंबियांसह, आप्तेष्टांनी दुःखावेगाने हंबरडा फोडला.
त्यानंतर सकाळी सव्वा नऊच्या सुमारास वीर जवान दादासो यांच्या पार्थिवाची सजविलेल्या ट्रक्टर मधून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी अंत्यदर्शनासाठी आबालवृद्धांसह महिलांचा जनसमुदाय लोटला होता. उपस्थितांच्यातून ’दादासो तोरसकर, अमर रहे’ तसेच ’भारतमाता की जय’चा जयघोष सुरु होता. सकाळी दहाच्या सुमारास अंत्यसंस्कारासाठी तयार करण्यात आलेल्या मोकळ्या रानात पार्थिव आणण्यात आले. यावेळी प्रशासनाकडून प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी, परिविक्षाधिन तहसीलदार रिचर्ड यानथन, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर, बी.एस.एफ.चे अधिकारी, आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसेच बी.एस.एफ असोसिएशनचे संपुर्ण महाराष्ट्रातून आलेले पदाधिकारी व सदस्य यांनी वीर जवान दादासो यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली अर्पण केली.
बी.एस.एफ. तसेच सातारा पोलिस दल यांच्याकडून बिगुल वाजवून व थ्री राऊंड फायर करुन मानवंदना देण्यात आली. नंतर वीर जवान दादासो यांच्या पार्थिवावर ठेवलेला तिरंगा ध्वज त्यांची पत्नी वनिता आणि मुले सुधीर व सुशांत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी भावानावेगाने उपस्थितांना हुंदका अनावर झाला.
सर्व धार्मिक विधी झाल्यानंतर वीर जवान दादासो यांच्या पार्थिवास मुलगा सुधीर याने मुखाग्नी दिला. त्यावेळी अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला.