निवती रॉक परिसरातील समुद्रात दुर्मिळ माशांची शिकार
मासेमारीसाठी गोव्यातील काही युवकांचा गट सक्रिय
परिसरातील जैव विविधता धोक्यात
शासनाने तात्काळ कारवाई करण्याची गरज
संदीप बोडवे / देवबाग:
सिंधुदुर्गात अवैध पद्धतीच्या स्पिअर फिशिंगद्वारे मासेमारी करण्यासाठी गोव्यातील काही युवकांचा एक गट सक्रिय झाला आहे. गोव्यातील स्कुबा क्षेत्राशी संबंधित हा गट असून निवती रॉक परिसरातील समुद्रात त्यांच्याकडून राजरोसपणे दुर्मिळ माशांची शिकार केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासाठी त्यांनी काही स्थानिकांनाही हाताशी धरले आहे.
स्कुबा डायव्हिंग क्षेत्रातील अभ्यासकांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गच्या निवती रॉक परिसरातील समुद्रात सागरी जैव विविधतेचा मोठा खजिना लपला आहे. याठिकाणी दुर्मिळ मत्स्यसंपदेचा संपन्न अधिवास पाहायला मिळतो. याच कारणामुळे निवती रॉक परिसरातील समुद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मात्र, सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसाय सद्यस्थितीत ठप्प असल्याचा फायदा उठवत गोव्यातील काही धनदांडग्या युवकांनी आपला मोर्चा सिंधुदुर्गकडे वळविला आहे. गोव्यातील या युवकांनी स्कुबा डायव्हिंगच्या नावाखाली ऍडव्हेंचर आणि थ्रील अनुभवण्यासाठी स्पिअर फिशिंगद्वारे येथील दुर्मिळ मत्स्यसंपदेची बिनदिक्कतपणे लूट सुरू केली आहे.
काय आहे स्पिअर फिशिंग?
काही प्रशिक्षित स्कुबा डायव्हर्स यांत्रिकी पद्धतीची गन अथवा भाला घेऊन समुद्रात लपलेल्या दुर्मिळ आणि किंमती माशांचा शोध घेतात. अशा माशांना त्यांच्या अधिवासाच्या ठिकाणी बेसावधपणे गाठत त्यांची यांत्रिकी गन किंवा भाल्याने शिकार करतात. अशाप्रकारे केल्या जाणाऱया मासेमारीला महाराष्ट्रात बंदी आहे. वस्तुतः स्कुबा डायव्हिंग क्षेत्रात पाण्यातील जैवसंपदेचा आदर करणे शिकविले जाते. त्याला कोणताही धोका पोहोचू नये, असा अलिखित नियमच आहे. मात्र, गोव्यासारख्या ठिकाणी झटपट पैसा, चंगळतेचा हव्यास, अनिर्बंध थ्रील अनुभवण्यासाठी अनेक युवक ऍडव्हेंचरच्या नावाखाली स्पिअर फिशिंगकडे वळू लागले आहेत.
स्कुबा क्षेत्रातील निगडीत गट कार्यरत
निवती रॉक येथे येऊन स्पिअर फिशिंग करणारा हा गट गोव्यातील स्कुबा क्षेत्राशी निगडित आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या गटातील तरुण स्कुबाचे प्रशिक्षण देत असताना गोव्यात मोठय़ा प्रमाणावर स्पिअर फिशिंग करत असतात. आता या तरुणांनी आपला मोर्चा निवती रॉक परिसरातील मत्स्य संपदेकडे वळविला आहे. स्कुबा डायव्हिंग आणि स्पिअर फिशिंगचे अत्याधुनिक साहित्य घेऊन हे तरुण निवती रॉक समुद्रातील दुर्मिळ आणि किंमती मत्स्य प्रजातींची शिकार करत आहेत. यासाठी त्यांनी काही स्थानिकांनाही हाताशी धरले आहे. सिंधुदुर्गातील काही पर्यटन व्यावसायिक येथील पर्यटन व्यवसाय बंद असल्याने आपल्या बोटी अशा गोव्याच्या स्कुबा डायव्हर्सना भाडय़ाने देताहेत. या बोटी घेऊन गोव्यातील प्रशिक्षित स्कुबा डायव्हर्स राजरोस निवती रॉक परिसरात अवैध मासेमारी करू लागले आहेत. अशा धोकादायक मासेमारीमुळे स्थानिक मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. निवती रॉकसारख्या संपन्न सागरी जैवविविधतेवर गोव्याच्या लुटारूंची नजर पडली असल्याने येथील जैवविविधता धोक्मयात आली आहे. यावर शासनाने तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे.
किंमती व दुर्मिळ माशांची शिकार
स्पिअर फिशिंग करताना खास करून समुद्रातील खडकाळ भागात गोब्रा, घूर (जिताडा), तांबोशी, बांदोशी, सुरमई, टूना, शिवड, बोडाये, कोकरी अशा किंमती व दुर्मिळ होत चाललेल्या माशांची शिकार अनैसर्गिकरित्या काही हौशी लोकांकडून करण्यात येत आहे.