वृत्तसंस्था/ तिरुमला
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कास्यपदक मिळवून देणारी महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आता नवोदितांसाठी विशाखापट्टणममध्ये बॅडमिंटन अकादमी सुरू करणार आहे.
देशातील युवा बॅडमिंटनपटूंना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि त्यांचा दर्जा सुधारावा या हेतूने पी. व्ही. सिंधू शासनाच्या सहकार्याने विशाखापट्टणम येथे लवकरच बॅडमिंटन अकादमी सुरू करणार आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कास्यपदक मिळविल्यानंतर सिंधूने तिरुमला देवस्थानला भेट देऊन भगवान तिरुपतीचे दर्शन घेतले. ऑलिम्पिक क्षेत्रामध्ये पाठोपाठ दोन पदके मिळविणारी पी. व्ही. सिंधू ही भारताची पहिली महिला बॅडमिंटनपटू आहे. 2024 साली होणाऱया पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करून भारताला सुवर्णपदक मिळवून देणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट राहील. या स्पर्धेसाठी आतापासूनच जोरदार सरावाला मी प्रारंभ करणार असल्याचे सिंधूने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.