वृत्तसंस्था/लखनौ
भारताच्या पीव्ही सिंधूने येथे सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठताना संघर्षपूर्ण विजय मिळविला तर पुरुष एकेरीत एचएस प्रणॉयचे आव्हान संपुष्टात आले.
अग्रमानांकिन सिंधूने थायलंडच्या सुपनिदा केटथाँगवर 11-21, 21-12, 21-17 असा विजय मिळवित आगेकूच केली. एक तास पाच मिनिटे ही लढत रंगली होती. पाचव्या मानांकित रशियाच्या एवगेनिया कोसेत्स्कायाशी तिची उपांत्य लढत होईल. पुरुष विभागात पाचव्या मानांकित एचएस प्रणॉयला फ्रान्सच्या अरनॉड मर्कलकडून 19-21, 16-21 असा पराभव स्वीकारावा लागला. मिथुन मंजुनाथने मात्र उपांत्य फेरी गाठताना रशियाच्या सर्जी सिरांतचा 11-21, 21-12, 21-18 असा पराभव केला.