वृत्तसंस्था/ बँकॉक
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या थायलंड खुल्या सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेत मंगळवारी भारताच्या पी.व्ही. सिंधू, किदांबी श्रीकांत आणि समीर वर्मा यांनी आपले एकेरीतील सामने जिंकून विजयी सलामी दिली पण सायना नेहवाल व सौरभ वर्मा यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. मिश्र दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज आणि अश्विनी पोन्नाप्पा यांनी दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला.
एक आठवडय़ापूर्वी येथे झालेल्या योनेक्स पुरस्कृत थायलंड खुल्या सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एकाही स्पर्धकाला दुसरी फेरी पार करता आली नव्हती पण मंगळवारपासून येथे सुरू झालेल्या दुसऱया बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी एकेरीमध्ये विजयी सलामी दिली पण सायना नेहवालचा अपवाद ठरला.
महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात थायलंडच्या चौथ्या मानांकित आर. इंटेनॉनने सायना नेहवालचा 21-17, 21-8 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत विजयी सलामी दिली. पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात अँथोनी सिनसुकाने सौरभ वर्मावर 21-16, 21-11 अशी मात करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. डेन्मार्कच्या गिमेकी बरोबरच्या सामन्यात खेळताना दुखापत झाल्याने भारताच्या पी. काश्यपने स्पर्धेतून माघार घेतली. महिला एकेरीच्या सामन्यात पी.व्ही. सिंधूने थायलंडच्या ओ. बुसाननवर 21-17, 21-13 अशी मात करत विजयी सलामी दिली. पुरूष एकेरीच्या सामन्यात भारताच्या के. श्रीकांतने थायलंडच्या एस.थेमासिनचा 21-11, 21-11 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. भारताच्या समीर वर्माने मलेशियाच्या ली चा 18-21, 27-25, 21-19 असा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. मिश्र दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात सात्विक साईराज आणि अश्विनी पोन्नाप्पा यांनी डेन्मार्कच्या नोहेर आणि मॅगेलुंड यांचा 23-21, 21-18 असा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश केला.