गुरुवारी नियम पाळून होणार कार्यक्रम : सुरक्षा रक्षकांकडून आयोजन
प्रतिनिधी / सातारा
जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी दहा वर्षांपूर्वी शोध लावलेल्या मंदिरात गुरुवार, दि. 26 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटी व शर्ती पाळून कार्तिकी एकादशी साजरी करण्यात येणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांच्या उपस्थितीत केवळ चार व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळून मोठय़ा भक्तिभावाने कार्तिकी एकादशी कार्तिकी एकादशी साजरी करण्यात येणार असल्याची माहिती सुरक्षारक्षकांनी दिली.
काही वर्षांपूर्वी सातारा जिल्हा रुग्णालयाच्या आवारात जुन्या शवविच्छेदन केंद्रानजिक एका व्यक्तीने पुरातन मंदिर बांधून त्यामध्ये एका देवीची स्थापना केली होती. कालांतराने मंदिर दुर्लक्षित झाले. 2009 साली सुरक्षारक्षक आनंदा घाडगे, दिलीप नलवडे, संदीप गार्डी, अण्णा वाळवेकर, नसीम मुलाणी, पृथ्वीराज गायकवाड यांनी साफसफाईचे काम हाती घेतले असता त्यांना ते मंदिर निदर्शनास आले. सलग आठ दिवस तो परिसर स्वच्छ करून त्या मंदिराला त्यांनी गतवैभव प्राप्त करून दिले. त्यानंतर त्याची पूजाअर्चा होऊ लागली.
या पुरातन मंदिरामध्ये विठ्ठल रुक्माई यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हापासून सुरक्षारक्षक आषाढी एकादशी, कार्तिक एकादशी वर्गणी काढून भक्तिभावाने साजरी करू लागले, सुरक्षारक्षकांच्या मागणीवरून तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश जगदाळे यांनी त्या मंदिराच्या समोरचा परिसर विकसित केला. मंदिराच्या समोर तुळशी वृंदावन लावण्यात आले. फ्लेवर बसवण्यात आले आहेत.