ऑनलाईन टीम/तरुण भारत
साधूच्या सांगण्यावरून शेअर बाजारात निर्णय घेणाऱ्या एनएसईच्या माजी अध्यक्षा चित्रा रामकृष्ण यांच्यावर सेबीकडून कारवाई करण्यात आली होती. आता चित्रा रामकृष्ण यांच्या सल्लागाराला सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) मध्ये काही वर्षांपूर्वी झालेल्या गोंधळाच्या प्रकरणी सीबीआयने आनंद सुब्रमण्यन यांना अटक केली आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी ही माहिती दिली.
राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आनंद सुब्रम्हण्यम हे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे माजी व्यवस्थापकीय संचालक आहेत. सुब्रम्हण्यम यांना चेन्नईतून सीबीआयने अटक केली आहे. रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.
सीबीआयने आनंद सुब्रम्हण्यमची तीन दिवस चौकशी केली होती. चित्रा रामकृष्ण या एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१६ या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. या काळात त्यांनी शेअर बाजाराशी संबंधित गोपनीय माहिती हिमालयातील एका योगीला पुरवली असल्याचा ठपका सेबीने ठेवला होता.