पात्रता संपादन करणारी चौथी भारतीय महिला, वर्ल्डकप क्वॉलिफायर्समध्ये सुमित मलिक रौप्यपदकाचा मानकरी
सोफिया-बल्गेरिया / वृत्तसंस्था
महिला मल्ल सीमा बिस्ला ही टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता संपादन करणारी चौथी भारतीय महिला ठरली. येथील वर्ल्डकप क्वॉलिफायर्स स्पर्धेत 50 किलोग्रॅम वजनगटात अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले आणि याचवेळी तिचा ऑलिम्पिकमधील सहभाग देखील निश्चित झाला. दुसरीकडे, अंतिम फेरीत पोहोचत आपले ऑलिम्पिक तिकीट निश्चित करणाऱया सुमित मलिकला मात्र दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्याने या पात्रता स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
सीमा बिस्लाने पोलंडची युरोपियन चॅम्पियनशिप कांस्यजेती ऍना लुकासियाक हिच्याविरुद्ध 2-1 अशा निसटत्या फरकाने विजय संपादन करत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. या लढतीत तिने प्रारंभी आघाडी घेतली होती आणि वेळ पूर्ण होईतोवर ही आघाडी कायम ठेवण्यात तिला यश प्राप्त झाले. आता इक्युडोरची प्रतिस्पर्धी ल्युसिया यमिलेथ येपेझ गझमनविरुद्ध तिची सुवर्णपदकासाठी लढत होणार आहे.
29 वर्षीय सीमा बिस्ला ही टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी चौथी भारतीय महिला मल्ल ठरली असून यापूर्वी विनेश फोगट (53 किलोग्रॅम वजनगट), अंशू मलिक (57 किलोग्रॅम), सोनम मलिक (62 किलोग्रॅम) यांनी ऑलिम्पिकसाठी आपली पात्रता यापूर्वीच निश्चित केली आहे. चार भारतीय महिलांनी एकाच वेळी ऑलिम्पिक प्रतिनिधीत्व करण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. यापूर्वी 2016 मधील ऑलिम्पिक स्पर्धेत 3 भारतीय महिला मल्लांनी प्रतिनिधीत्व केले होते.
दरम्यान, या पात्रता फेरीत निशा (68 किलोग्रॅम वजनगट) व पूजा (76 किलोग्रॅम) यांना मात्र आपल्या लढतीत पराभव पत्करावे लागल्याने ऑलिम्पिकमधील कोटा मिळवता आला नाही.
सुमितची अंतिम लढतीतून माघार
पुरुष गटात ऑलिम्पिक पात्रता संपादन करणारा केवळ चौथा मल्ल ठरलेल्या सुमित मलिकला 125 किलोग्रॅम वजनगटातील अंतिम लढतीत दुखापतीमुळे मॅटवर उतरताही आले नाही. गुडघ्याची दुखापत असल्याने त्याने आपण खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. या गटात रशियाच्या सर्जेई कोझिरेव्हला सुवर्णपदक बहाल केले गेले. सुमित मलिक रौप्यपदकाचा मानकरी ठरला. शुक्रवारीच त्याने अंतिम फेरीतील स्थान निश्चित करत आपल्या ऑलिम्पिक सहभागावर शिक्कामोर्तब केले आहे.
सीमाच्या जिद्दीला यश
दिवसाच्या प्रारंभी, सीमाने बेलारुसच्या ऍनास्तासिया यानोतॅव्हाविरुद्ध उपउपांत्यपूर्व फेरीत 8-0 अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला होता. भक्कम बचावाचा उत्तम दाखला देत तिने दोन्ही सत्रात प्रत्येकी 4 गुणांची कमाई केली होती. सीमाने स्वीडनच्या इम्मा जोनाविरुद्ध 43 सेकंदांचा वेळ बाकी असतानाच विजयावर शिक्कामोर्तब केले होते. सीमाने आपली ताकद योग्य वेळी पणाला लावली आणि सातत्याने आक्रमणावर भर दिला. या दुहेरी रणनीतीमुळे तिला उत्तम यश लाभले. एकवेळ तर ती 10-2 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर होती आणि याचे विजयात रुपांतर करण्यास तिला काहीच अधिक प्रयास करावे लागले नाहीत.
अन्य लढतीत निशाला बल्गेरियाच्या मिमि ऱिहस्तोव्हाविरुद्ध तांत्रिक सरसतेच्या निकषावर पराभव पत्करावा लागला. निशाचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. बल्गेरियन मिमिने 4 गुणांची आघाडी घेतली आणि यानंतर निशा सातत्याने बॅकफूटवर फेकली गेली. या पात्रता स्पर्धेतील तिसरी भारतीय महिला मल्ल पूजाने पहिल्या फेरीत विजय संपादन केला. पण, त्यानंतर तिला लिथुआनियाच्या कॅमिले गॉकेटविरुद्ध 3-4 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला.
सुमित मलिकची दुखापत जुनीच!
काही आठवडय़ांपूर्वी आयोजित राष्ट्रीय सराव शिबिरात सराव करताना सुमित मलिकला दुखापत झाली होती. मात्र, ऑलिम्पिकमधील सहभाग निश्चित करण्याचे उद्दिष्टय़ साध्य करण्यासाठी त्याने या स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला होता, असे राष्ट्रीय प्रशिक्षक जगमंदर सिंग यांनी यावेळी गौप्यस्फोट केला.
‘त्याची दुखापत किरकोळ स्वरुपाची आहे आणि ऑलिम्पिक कोटा निश्चित करण्याचे लक्ष्य समोर असल्याने त्याला उतरणे भाग होते. यापूर्वी मागील महिन्यात आशियाई चॅम्पियनशिप व ऑलिम्पिक क्वॉलिफायर्समध्ये देखील ही दुखापत असतानाही तो उतरला होता. येथे ऑलिम्पिक सहभाग निश्चित करण्याची शेवटची संधी असल्याने त्याने आणखी एकदा धोका स्वीकारला. वास्तविक, येथे उतरण्यापूर्वी त्याने फारसा सरावही केलेला नव्हता. पण, चारही बाऊटमधील त्याची कामगिरी विशेष प्रशंसनीय, लक्षवेधी ठरली’, असे जगमंदर पुढे म्हणाले.