प्रतिनिधी / फोंडा
मगो पक्षाचे नेते व मडकई मतदारसंघाचे आमदार सुदिन ढवळीकर यांची प्रकृती पुन्हा खालावल्याने त्यांना पणजी येथील मणिपाल इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थीर आहे. गेल्या 18 ऑगस्ट रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे उपचारासाठी त्यांना मणिपाल इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
प्रकृतीत सुधारण झाल्याने चतुर्थीच्या आदल्या दिवशी शुक्रवारी त्यांना घरी पाठवण्यात आले होते. मागील पाच दिवसांपासून ते बांदोडा येथील आपल्या निवासस्थानी क्वॉरंटाईन झाले होते. काल सोमवारी सकाळी त्यांना ताप आला व प्रकृती खालावल्याने तातडीने मणिपाल इस्पितळात दाखल करावे लागले. सध्या इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून समजले आहे. दरम्यान सुदिन ढवळीकर यांच्या पत्नी तसेच अन्य काही कुटुंब सदस्य कोरोनाबाधीत आढळल्याने त्यांना घरीच क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.