वृत्तसंस्था/ व्हान्टा
स्टार खेळाडूंशिवाय खेळणाऱया भारताच्या बॅडमिंटन संघाला बलाढय़ चीनकडून एकतर्फी पराभव स्वीकारावा लागल्याने सुदिरमन चषक स्पर्धेत बाद फेरीसाठी पात्र ठरण्याच्या आशाही संपुष्टात आल्या. भारताने ही लढत 0-5 अशी गमविली.
गट अ मध्ये असणाऱया भारताचा हा सलग दुसरा पराभव असून पहिल्या लढतीत थायलंडने त्यांना हरविले होते. गटातील शेवटची साखळी लढत फिनलँडविरुद्ध बुधवारी होणार असून त्याच्या निकालाचा भारताला फायदा होणार नाही. भारतीय संघात युवा खेळाडूंचाच समावेश असल्याने 11 वेळा जेतेपद मिळविणाऱया चीनविरुद्ध भारताला विजयाची संधी कमीच होती. भारतीय खेळाडूंना या लढतीत एकही गेम जिंकता आला नाही, यावरूनच भारताची बेंच स्ट्रेंग्थ फारशी मजबूत नसल्याचे स्पष्ट होते.
दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी पीव्ही सिंधू, लंडन ऑलिम्पिक कांस्यविजेती सायना नेहवाल, पुरुष दुहेरीची जोडी चिराग शेट्टी व सात्विक साईराज रनकिरेड्डी यांची गैरहजेरी भारताच्या आशेला धक्का देणारी ठरल्याने या स्पर्धेत सांघिक कामगिरी खूपच निराशाजनक झाली आहे. पुरुष दुहेरीच्या सामन्यात एमआर अर्जुन व धुव कपिल यांनी लियू चेंग व झोयू हाओ डाँग यांना चांगली लढत दिली. पण अखेर त्यांना 20-22, 17-21 अशी हार पत्करावी लागली. युवा आदिती भट्टला महिला एकेरीत ऑलिम्पिक चॅम्पियन चेन युफेईकडून 21-9, 21-8 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर पुरुष एकेरीत जागतिक 15 वा मानांकित बी. साई प्रणीतची लढत ऑल इंग्लंड चॅम्पियन शि युकीविरुद्ध झाली. पण युकीने त्याला हरविताना 21-10, 21-10 असा विजय मिळवित चीनला 3-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली.
लढतीतील विजय निश्चित झाल्याने शेवटचे दोन सामने बिनमहत्त्वाचे होते. राष्ट्रकुल कांस्यविजेती जोडी अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी यांना महिला दुहेरीत झेंग यु व लि वेन मेई यांच्याकडून 21-16, 21-13 असा तर मिश्र दुहेरीत दु युई व फेंग यान झे यांनी किदाम्बी श्रीकांत व रुतुपर्णा पांडा यांना 21-9, 21-9 असे सहज नमवित चीनला निर्भेळ यश मिळवून दिले. पुरुष एकेरीत साई प्रणीत शि युकीकडून पाचव्यांदा पराभूत झाला. वेग व भक्कम बचावाच्या बळावर युकीने प्रणीतला बरेच दमवले. दोघांनी काही वेगवान रॅलीज खेळल्या. पण साई प्रणीतला युकीचा बचाव भेदण्यात यश आले नाही.