डिसेंबरमधील एकूण वापर 11 महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारीदरम्यान सकारात्मक आकडेवारी समोर आली आहे. डिसेंबरमध्ये सलग चौथ्या महिन्यात इंधनाच्या मागणीत वृद्धीची नोंद झाली आहे. अर्थव्यवस्थेत सकारात्मक सुधारामुळे एकूण वापरही 11 महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. परंतु हे प्रमाण कोरोनापूर्वपेक्षा अद्याप 2 टक्क्यांनी कमी आहे.
पेट्रोलियम मंत्रालयानुसार डिसेंबरमध्ये पेट्रोलियम उत्पादनांची मागणी 18.59 दशलक्ष टन राहिली आहे. यापूर्वीच्या वर्षाच्या (डिसेंबर 2019) समान कालावधीत हे प्रमाण 18.94 दशलक्ष टन इतके होते. परंतु मासिक आधारावर इंधनवापरात सकारात्मक वृद्धीची नोंद होणारा हा सलग चौथा महिना राहिला आहे. यापूर्वी नोव्हेंबरमध्येही इंधनाचा वापर 17.86 दशलक्ष टन राहिला होता. डिसेंबरमधील इंधनवापराचा आकडा हा फेब्रुवारी 2020 नंतरचा उच्चांकी आहे.
टाळेबंदीमुळे एप्रिल महिन्यात इंधनाची मागणी 49 टक्क्यांनी कमी झाली होती. 69 दिवसांच्या कठोर टाळेबंदीदरम्यान देशभरात जवळपास सर्वप्रकारची वाहतूक ठप्प पडली होती. परंतु सणासुदीच्या काळापूर्वी अनलॉक प्रक्रियेंतर्गत सूट मिळाल्यावर इंधनाच्या मागणीत सकारात्मक वृद्धी नोंद होत आहे.
जेटइंधनाचा वापर घटला
वीजनिर्मिती आणि पेट्रोकेमिकलच्या निर्मितीत वापरल्या जाणाऱया नाफ्ताचा वापर डिसेंबरमध्ये 2.67 टक्क्यांनी वाढून 1.23 दशलक्ष टन राहिला आहे. रस्तेनिर्मितीसाठी वापरण्यात येणाऱया बिटुमिनचा वापर 20 टक्क्यांनी वाढून 7.61 हजार टनावर पोहोचला आहे. घरगुती गॅसचा वापर 7.4 टक्क्यांनी वाढून 2.53 दशलक्ष टनावर गेला आहे. टाळेबंदीच्या काळातही मागणी वाढणारे एलपीजी हे एकमेव इंधन ठरले आहे. एव्हिएशन टर्बाइन फ्युल (एटीएफ)ची विक्री डिसेंबरमध्ये 41 टक्क्यांनी कमी होत 4.28 हजार टनावर आली आहे. अनेक एअरलाइन्स कंपन्यांना अद्याप पूर्णपणे सेवा सुरू करता न आल्याने ही स्थिती आहे. परंतु मासिक आधारावर यात 13.5 टक्क्यांची सकारात्मक वृद्धी दिसून आली आहे.
कोळशाची आयात रोडावली
एप्रिल-नोव्हेंबरदरम्यान भारताची कोळशाची आयात 17 टक्क्यांनी कमी होत 137.16 दशलक्ष टन राहिली आहे. 2019 मधील समान कालावधीत हा आकडा 165.35 दशलक्ष टन राहिला होता. यात केवळ नोव्हेंबर 2020 मध्ये कोळशाची आयात 20.35 दशलक्ष टन राहिली आहे.
डिझेलच्या वापरात घट
इंधनवापरात सुमारे 40 टक्के हिस्सेदारी बाळगणाऱया डिझेलचा वापर 2019 च्या तुलनेत डिसेंबर महिन्यात 2.7 टक्क्यांनी कमी होत 7.18 दशलक्ष टन राहिला आहे. नोव्हेंबर महिन्यात हे प्रमाण 6.9 टक्क्यांनी कमी राहिले होते. परंतु ऑक्टोबरमध्ये हा आकडा 7.4 टक्क्यांनी वाढला होता. दुसरीकडे पेट्रोलचा एकूण वापर सप्टेंबरमध्येच कोरोनापूर्व पातळीच्या पलिकडे पोहोचला होता.