विशाखापट्टणम
हैदराबादच्या एका विशेष अंमलबजावणी न्यायालयाने आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआरपीचे प्रमुख वायएस जगनमोहन रेड्डी तसेच इतरांना समन्स बजावला आहे. तसेच त्यांना 11 जानेवारी रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. जगन, पक्षाचे खासदार विजयासाई रेड्डी, फार्मा कंपन्या हेटेरो ड्रग्स, अरविंदो फार्मा आणि ट्रायडेंट लाइफ सायन्सेसला समन्स बजावण्यात आला आहे. सीबीआय जगनमोहन रेड्डी यांच्या क्विड प्रो क्वॉ प्रकरणाचीही चौकशी करत आहे. या औषध कंपन्यांना आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांच्या कार्यकाळात भूखंड प्राप्त झाले होते. या भूखंडांच्या बदल्यात या कंपन्यांनी जगन यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. जगनमोहन यांच्या वडिलांच्या नेतृत्वाखालील सरकारने मूल्य निश्चिती समितीच्या निर्णयाच्या विरोधात जात अरविंदो आणि हेटेरो या कंपन्यांना भूखंड वितरित केल्याचा आरोप आहे. या कंपन्यांना 75 एकर जमीन 7 लाख रुपये प्रतिएकराच्या दराने उपलब्ध करण्यात आली होती.