मालिकावीर रोहन यारिसिमीला सायकल बक्षीस
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
ध्रुव देसाईची अष्टपैलू खेळी आणि फिरकी गोलंदाजांची प्रभावी कामगिरी यांच्या बळावर सुपर एक्स्प्रेस अर्जुन स्पोर्ट्सने साईराज हुबळी टायगर्स संघाचा 3 गडय़ानी पराभव करून पहिला 16 वर्षाखालील दीपक नार्वेकर बीपीसी चषक पटकाविला. ध्रुव देसाईला सामनावीर पुरस्कार देण्यात आला तर मालिकावीरचा बहुमान मिळविणाऱया रोहन यारिसीमीला सायकल प्रदान करण्यात आली. याशिवाय केदार ऊसुलकरला फलंदाज, सिद्धार्थ हुल्लोळीला गोलंदाज, करण बोकडेला क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
दीपक नार्वेकर पुरस्कृत 16 वर्षाखालील बीपीसी चषक लीग क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात साईराज हुबळी टायगर्स संघाने निर्धारीत 25 षटकात 9 बाद 144 धावा केल्या. रोहन यारिसिमीने 28, आकाश कुलकर्णीने नाबाद 24, अर्णव नुगानट्टीने 23 तर सुजल पाटीलने 18 धावा केल्या. सुपर एक्स्प्रेस अर्जुन स्पोर्ट्सतर्फे सिद्धेश असलकरने 23 धावात 2, करण बोकडेने 30 धावात 2, ध्रुव देसाई व आकाश असलकर यांनी प्रत्येकी 31 धावात दोन गडी बाद केले. त्यानंतर सुपर एक्स्मप्रेस अर्जुन स्पोर्ट्सने शेवटच्या षटकात तीन चेडू बाकी ठेवत रोमांचक विजय साकारला. त्यांनी 24.3 षटकात 7 बाद 145 धावा जमवित जेतेपद पटकावले. ध्रुव देसाईने 6 चौकारासह नाबाद 58, सात्विक सावंतने 33 धावा केल्या. साईराज हुबळी टायगर्सतर्फे रोहन यारिसिमीने 19 धावात 4 गडी तर आर्यन गवळीने 1 गडी बाद केला.
स्पर्धा पुरस्कर्ते दीपक नार्वेकर, लॅंड डेव्हलपर प्रकाश पाटील, प्रणय शेट्टी, सुपर एक्स्प्रेस रोडलाईनचे संचालक विठ्ठल गवस, विक्रम देसाई, नागेश देसाई, परशराम पाटील, जयसिंह राजपूत, नासिर सनदी आदींच्या हस्ते विजेत्या सुपर एक्स्प्रेस अर्जुन स्पोर्ट्स व उपविजेत्या साईराज हुबळी टायगर्स संघाना गौरविण्यात आले. यावेळी सर्व संघमालकांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
वैयक्तिक बक्षिसे पुढीलप्रमाणे : उत्कृष्ट फलंदाज केदार उसुलकर (साईराज), अंतिम सामन्यातील सामनावीर ध्रुव देसाई (सुपर एक्स्प्रेस), उत्कृष्ट गोलंदाज सिद्धार्थ हुल्लोळी (अलोन स्पोर्ट्स), अंतिम सामन्यातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक करण बोकडे (अर्जुन स्पोर्ट्स) यांना गौरविण्यात आले. मालिकावीर रोहन यारिसिमीला (सुपर एक्स्प्रेस) प्रणय शेट्टी यांनी आपले वडील रत्नाकर शेट्टी यांच्या स्मरणार्थ गियरची सायकल देऊन गौरविण्यात आले. समाजसेवक बबन भोबे यांनी करण बोकडे यांना मनगटी घडय़ाळ दिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनिल गवी, ज्योती पाटील यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जयसिंह राजपूत, आभार नागेश देसाई यांनी मानले.