चार भारतीय पहिल्या फेरीत पराभूत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बल्गेरियातील सोफिया येथे सुरू झालेल्या 73 व्या स्टँडा मेमोरियल मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताचा बॉक्सर सुमित कुंडूने 75 किलो वजन गटाच्या लढतीत वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील रौप्यविजेत्या रशियाच्या झाम्बुलत बिझामोव्हचा धक्कादायक पराभव करून दुसरी फेरी गाठली. मात्र अन्य तीन भारतीयांना पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला.
विद्यमान राष्ट्रीय चॅम्पियन असलेल्या सुमितची ही केवळ दुसरी वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. त्याने बिझामोव्हवर 5-0 अशी एकतर्फी गुणांनी मात केली. त्याची पुढील लढत युक्रेनच्या ओलेक्सांडर खीझनियाकशी होईल. नरेंदर बेनवाल (92 किलोवरील), वरिंदर सिंग (60 किलो), लक्षय चहर (86 किलो) यांना मात्र पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. नरेंदरला स्पेनच्या अयूब घाडफाने 3-2 असे तर वरिंदर व चहर यांना रशियाच्या अर्तुर सुबखानकुलोव्ह व शराबुद्दिन अताएव्ह यांच्याकडून अनुक्रमे 0-5 व 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेच्या दुसऱया दिवशी चार भारतीय बॉक्सर्स रिंगणात दिसणार आहेत. महिलांच्या 54 किलो गटात शिक्षाची लढत आशियाई चॅम्पियन दिना झोलामनविरुद्ध (कझाक) होईल तर नितू (48 किलो) व अनामिका (50 किलो) यांच्याही लढती होतील. पुरुष विभागात आकाश सांगवानला (67 किलो) पहिल्या फेरीत बाय मिळाला होता. दुसऱया फेरीत त्याची लढत जर्मनीच्या डेनियल क्रॉटरशी होणार आहे.
या स्पर्धेत 36 देशांतील 450 हून अधिक बॉक्सर्स सहभागी झाले असून त्यात पारंपरिक पॉवरहाऊस कझाकस्तान, इटली, रशिया, फ्रान्स यांचा समावेश आहे. भारताने 17 सदस्यीय पथक पाठविले असून त्यात सात पुरुष व दहा महिलांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या मागील आवृत्तीत भारताने दोन पदके मिळविली होती, दीपक कुमार व नवीन बूरा यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळविले होते.