5 किलोमीटरपर्यंतच्या भागाला धोका
युक्रेनच्या सुमी क्षेत्रात रशियाच्या बॉम्बवर्षावामुळे अमोनिया वायूची गळती झाल्याची घटना घडल्याची माहिती सोमवारी सकाळी समोर आली आहे. अमोनिया हा रंगहीन विषारी वायू आहे. या वायुगळतीचा सुमीमध्ये 5 किलोमीटरच्या कक्षेत प्रभाव दिसून आला आहे. हा वायू हवेपेक्षाही हलका असतो. बंदिस्त ठिकाणी, भूमिगत निवारा केंद्रांमध्ये जाऊन स्वतःला वाचवा असा सल्ला युक्रेनच्या सरकारकडून लोकांना देण्यात आला आहे.
अमोनिया वायूच्या तडाख्यात सापडण्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी भूमिगत बंकरमध्ये त्वरित पोहोचा किंवा बाथरुमध्ये जात आंघोळ करून घ्या. तसेच ओली पट्टी नाकावर ठेवून श्वास घेण्याचा सल्ला स्थानिकांना देण्यात आला आहे. तर प्रशासनाने या वायुगळतीचा लोकांवर दुष्परिणाम होऊ नये म्हणून अनेक उपाययोजना हाती घेतल्या असून यात काही प्रमाणात यश देखील आले आहे. तर काही लोकांना श्वास घेताना त्रासही जाणवला आहे.
रशियाकडून केमिकल प्रकल्पावर बॉम्बवर्षाव करण्यात आल्याने विषारी वायूची गळती झाली आहे. 21 मार्च रोजी रशियाच्या हवाईहल्ल्यामुळे सुमीखिंप्रमो केमिकल प्रकल्पातून पहाटे 4.30 वाजता अमोनिया वायूची गळती सुरू झाली. या वायुगळतीमुळे नोवोसेलित्सा आणि वेरखन्या सिरोवत्का या गावांना धोका निर्माण झाल्याचे सुमी ओब्लास्टचे गव्हर्नर दिमित्रि ज्य्वित्स्की यांनी म्हटले आहे.