कोलकाता
पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांना त्यांच्या अंगरक्षकाच्या आत्महत्या प्रकरणात सीआयडीने चौकशीसाठी पाचारण केले आहे. सीआयडी अधिकाऱयांनी त्यांना समन्स बजावले असून सोमवारी भवानी भवन कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. सुवेंदू अधिकारी यांच्या अंगरक्षकाने स्वतःवर गोळी चालवून आत्महत्या केली होती. या प्रकरणात त्यांच्या पत्नीने अधिकारी यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार सीआयडीने या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक पथक स्थापन केले आहे. या चौकशी पथकाने आत्तापर्यंत 11 पोलीस कर्मचाऱयांसह एकूण पंधरा जणांची चौकशी केली आहे.
अभिषेक बॅनर्जी आज ‘ईडी’समोर
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी सोमवारी दिल्लीत ईडीसमोर हजर होतील. कोळसा तस्करीशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात तपास यंत्रणा त्यांची चौकशी करेल. रविवारी सायंकाळी ते कोलकाताहून दिल्लीला रवाना झाले आहेत. अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नीलाही समन्स जारी करण्यात आले आहे. मात्र, त्यांनी कोरोना संसर्गाचे कारण पुढे करत आपली निवासस्थानीच चौकशी करण्याची विनंती तपास यंत्रणांना केली आहे.