छत्तीसगडमधील प्रकार – ब्राह्मण समुदायाबद्दल केली होती वादग्रस्त टिप्पणी
वृत्तसंस्था / रायपूर
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडिल नंदकुमार बघेल यांच्या विरोधात राज्य सरकारने धार्मिक भावना दुखावणे, दंगल भडकविण्याशी संबंधित कमल 153 अ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. राजधानी रायपूरच्या डीडी नगर पोलीस स्थानकात नंदकुमार यांनी ब्राह्मणांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाची दखल घेत सरकारने हा गुन्हा नोंदविला आहे.
30 ऑगस्ट रोजी नंदकुमार यांनी उत्तरप्रदेशच्या लखनौमध्ये ब्राह्मण दिवेशी असून त्यांना मंदिरातून बाहेर काढण्यासाठी मोठे आंदोलन करणार असल्याचे म्हटले होते. गावागावात जाऊन ब्राह्मणांवर बहिष्कार टाकणार असल्याचे नंदकुमार यांचे विधान सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले होते.
नंदकुमार यांच्या या विधानामुळे भाजपला राज्य सरकारविरोधात मुद्दा सापडला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष विष्णुदेव साय यांनी व्हिडिओ ट्विट करत थेट राहुल गांधी आणि भूपेश बघेल यांनाच प्रश्न विचारला होता. द्वेष फैलावणाऱया स्वतःच्या वडिलांच्या विधानाचे बघेल समर्थन करतात का? कथित जानवेधारी ब्राह्मण राहुल गांधी विदेशी आहेत का अशी खोचक विचारणा भाजप नेत्याने केली होती.
मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
विरोधकांकडून होत असलेल्या टीकेदरम्यान भूपेश बघेल यांनी एक लेखी वक्तव्य प्रसिद्ध केले आहे. वडिल नंदकुमार बघेल यांच्याशी माझे पहिल्यापासूनच वैचारिक मतभेद आहेत. त्यांच्या या विधानामुळे सामाजिक सद्भावाला ठेच पोहोचली असून मला प्रचंड दुःख झाले आहे. पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई करावी असे मुख्यमंत्री बघेल यांनी म्हटले आहे.
ब्राह्मण समुदायाकडून तक्रार
सर्व ब्राह्मण समाज सुंदरनगरने नंदकुमार बघेल यांच्या विरोधात तक्रार केली होती. नंदकुमार यांनी ब्राह्मण समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे नमूद होते. याप्रकरणी 4 सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदवून तपास सुरू केल्याची माहिती पोलीस स्थानक प्रभारी योगिता खापर्डे यांनी दिली आहे.