ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय अन्वेषण विभागाने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ईमेल आणि सोशल मीडिया अकाऊंटमधून डिलिट करण्यात आलेला डेटा परत मिळविण्यासाठी अमेरिकेकडे मदत मागितली आहे. एमएलएटीच्या करारांतर्गत कॅलिफोर्नियास्थित गुगल आणि फेसबुककडून ही माहिती मागविण्यात आली आहे.
14 जून रोजी मुंबईतील राहत्या घरात सुशांत सिंगने आत्महत्या केली होती. या केसचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. सुशांतचे वडील के के रजपूत यांनी रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाविरोधात यापूर्वीच तक्रार दाखल केली आहे. मात्र, सुशांतच्या आत्महत्येच्या दिवशी नेमके काय घडले, याची माहिती मिळविण्यासाठी सुशांतचे इमेल्स आणि सोशल मीडियावरील डिलिट करण्यात आलेला डेटा सीबीआयला हवा आहे. त्यासाठी एमएलएटीच्या करारांतर्गत कॅलिफोर्नियास्थित गुगल आणि फेसबुककडून सीबीआयने मदत मागितली आहे. एमएलएटी कराराअंतर्गत अमेरिकेत अशी माहिती अमेरिकेतील ऍटर्नी जनरल कार्यालयाकडून प्राप्त होते.