एसटी स्थानकावर शंभर गाड्य़ा थांबून, 326 कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग
प्रतिनिधी/मिरज
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला राज्य शासनात विलीन करावे, या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या एसटी कर्मचारी संपाच्या आंदोलनाची तीव्रता अधिक वाढली आहे. बहुतांशी आगारातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे संपात सहभाग घेतल्यामुळे आगारांचे कामकाज ठप्प झाले आहे. मिरज आगारातील 326 कर्मचारी संपावर गेल्याने आत्तापर्यंत पाचशे एसटी फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. यामुळे एसटी महामंडळाचे सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. एसटी स्थानक आवारात शंभरहून अधिक एसटी बसेस थांबून आहेत. एसटी सेवा ठप्प झाल्यामुळे प्रवाशांनी खासगी वाहनांचा आधार घेतला असून, एसटी स्थानकांवर मात्र शुकशुकाट पहायला मिळत आहे.