ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस आता बॉलिवूडमधील निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याची चौकशी करणार आहेत. या आठवड्याच्या अखेरीस करण जोहरचा जबाब नोंदवला जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच मंगळवारी धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांची चौकशी होणार आहे. पोलिसांनी धर्मा प्रॉडक्शन आणि सुशांत यांच्यातील ‘ड्राईव्ह’ चित्रपटासंदर्भातील कराराची प्रतही मागितली आहे. पोलीस तपासात सुशांत आणि धर्मा प्रॉडक्शन यांच्यात ‘ड्राईव्ह’ चित्रपटावरुन वाद निर्माण झाल्याचे समोर आलं आहे. खुद्द सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदीने पोलीस चौकशीत करण जोहर आणि सुशांत यांच्यातील एका प्रोजेक्टबद्दल महत्त्वाची माहिती दिली.
श्रुती मोदीच्या मते, सुशांतने धर्मा प्रॉडक्शनच्या ‘ड्राईव्ह’ चित्रपटात काम केले. त्या चित्रपटाच्या डबिंगसाठी सुशांत तारीख देत नव्हता. यावर श्रुती सुशांतशी बोलली, तेव्हा सुशांत म्हणाला की मी तीन वेळा डबिंगसाठी तारीख दिली होती, पण त्यावेळी त्यांच्याकडून (करणने) काहीच उत्तर मिळाले नाही, आता मी माझा वेळ घेतोय. या चित्रपटासंदर्भात सुशांत आणि करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये काही मतभेद निर्माण झाले होते का याची माहिती आता मुंबई पोलीस घेत आहेत.
दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत 37 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. कालच प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची सांताक्रूझ पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर महेश भट्ट यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला.