बेळगाव : पटवर्धन लेआऊट, वडगाव येथील सुहासिनी महिला मंडळाचा तिळगूळ समारंभ नुकताच पार पडला. प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगरसेविका नीलिमा मनोज पावशे उपस्थित होत्या. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर मंडळाच्या अध्यक्षा नंदिनी चौगुले यांनी त्यांचा परिचय व मंडळाच्या सामाजिक कार्याची माहिती करून दिली. मंडळाच्या उपाध्यक्षा वृंदा तडकोड यांनी फुलांचे रोप देऊन स्वागत केले.
यावेळी नीलिमा पावशे म्हणाल्या, महिलांवर कोणतीही जबाबदारी दिली तर अगदी यशस्वीपणे पार पाडतात. यासाठी महिलांनी अशा मंडळाच्या माध्यमातून एकत्र यावे आणि तळागाळातील महिलांना सक्षम करावे. तुमच्या मंडळाकडून खूप चांगले सामाजिक कार्य घडो, असे सांगून शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. विद्या तोपिनकट्टी यांनी केले. कार्यक्रमासाठी वनिता बिर्जे, अपर्णा भंडारी, ऐश्वर्या पाटील, गायत्री कांबळे, विद्या जाजू यांनी परिश्रम घेतले.