मंत्री शंभुराज देसाई- मुख्यालयासह दोन इमारतींचाही समावेश- विविध विषयांवर चर्चा
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हय़ाचे ठिकाण असलेल्या सातारा शहरातील पोलीस अधिक्षक कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी व सातारा शहर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेले असून वित्त विभागातून विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करुन घेणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. दरम्यान, राज्यात पोलीस दलात 12 हजार पदे भरण्यात येणार असून आरंभी 5 हजार 400 पदे प्राधान्यक्रमाने भरण्यात येणार असून यामध्ये जिल्हयाला प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना येणाऱया समस्यांचे निराकारण करण्यासाठी सातारा विश्रामगृहात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, पोलीस गृहविभागाचे अधिक्षक साळुंखे तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. मंत्री देसाई यांनी समस्या समजावून त्यावर मार्गही काढले.
यावेळी मंत्री देसाई यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय आणि सातारा शहर पोलीस स्टेशन व सातारा वाहतूक शाखा यांच्या नवीन इमारती करिता प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. सदर प्रस्तावाचा पाठपुरावा मंत्रालय स्तरावर ती करून याकरिता वित्त विभागातून विशेष बाब म्हणून निधी उपलब्धता करून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. पोलीस विभागामध्ये असणारी रिक्त जागांची कमतरता पूर्ण करण्याकरिता राज्य स्तरावर एकूण 12 हजार पदे भरणार असल्याची मंत्रीमहोदय यांनी माहिती दिली. तरी त्यामधील 5400 पदे भरायला प्राधान्यक्रमाने सुरुवात करणार आहोत पहिल्या टप्प्यामध्ये ही पदे भरली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पोलीस वसाहतींच्या देखभाल आणि दुरुस्ती बाबत चर्चा झाली. यामध्ये डीपीडीसी मधून 7 पोलीस स्टेशनच्या वसाहत करता, त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्परतेने पाठपुरावा करून लवकरात लवकर सदर इमारतींची दुरुस्ती करण्यात यावी अशा सूचना मंत्री देसाई यांनी दिल्या.
ढेबेवाडीत पोलीस वसाहत उपलब्ध नाही, पोलीस वसाहत उपलब्ध आहे ती कालबाह्य झालेले आहे. त्यामुळे वसाहतीसाठी नवीन प्रस्ताव सादर करण्याची सूचना मंत्री देसाई यांनी केली. तर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतनाबाबत आस्थेने विचारपूस केली. वेतन एक तारखेच्या पूर्वी दिले जाते अशी माहिती दिल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले. तर नवीन वाहनांसंदर्भात पोलीस अधिक्षकांनी सादर केलेल्या प्रस्तावाचा मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन मंत्री देसाई यांनी यावेळी दिले.