सेन्सेक्स 308 अंकांनी मजबूत, रिलायन्स नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील शेवटच्या दिवशी भारतीय भांडवली बाजार तेजीसह बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये दिवसभरातील कामगिरीनंतर रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि कोटक बँक यांचे समभाग नफा कमाईत राहिले आहेत. तसेच जागतिक बाजारातील सकारात्क वातावरणामुळे भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाल्याची नोंद केली आहे.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीमुळे बीएसई सेन्सेक्स 307.66 अंकांनी वधारुन निर्देशांक 51,422.88 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने मात्र नवा विक्रम प्राप्त केला आहे. यामध्ये निफ्टीचा निर्देशांक दिवसअखेर 97.80 अंकांच्या मजबूतीसह 15,435.65 वर स्थिरावला आहे.
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग सर्वाधिक सहा टक्क्यांनी वधारले आहेत. यासह महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, कोटक बँक, आयटीसी आणि भारती एअरटेलचे समभाग नफा कमाईत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये सन फार्मा, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक आणि डॉ. रेड्डीज लॅब यांचे समभाग शुक्रवारच्या सत्रात नुकसानीत राहिल्याची नोंद आहे.
चालू आठवडय़ात बीएसईमधील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारी भांडवल विक्रमी स्तरावर पोहोचले आहे. याच्या व्यतिरिक्त सध्या कोविड संसर्गाचे नवीन बाधित प्रतिदिन दोन लाखाच्या खाली येत असून रिकव्हरी दरात सुधारणा होत असल्याचाही फायदा भारतीय बाजाराला झाला आहे.
तेजी कायम ठेवणाऱया घटना
अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणात्मक संकेत आणि कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीमधील सादर होत असणाऱया नफा कमाईच्या सकारात्मक अहवालामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास मजबूत होत गेला आहे. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर राहिल्याने सेन्सेक्स-निफ्टीमधील तेजीचा प्रवास कायम राहिल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.