निर्देशांकांच्या विक्रमाचा प्रवास सुरुच – निफ्टी 17,000 च्या उंचीवर
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराने पुन्हा एकदा नवा उच्चांक प्राप्त करत विक्रम नोंदवला आहे. यामध्ये दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स 277 अंकांनी मजबूत होत, 58,000 चा टप्पा प्राप्त केल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये जागतिक पातळीवरील वातावरणाचा सकारात्मक कल राहिला होता. त्याचा फायदा हा भारतीय भांडवली बाजाराला झाला आहे.
दिग्गज कंपन्याच्या मदतीने दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 277.41 अंकांसह 0.48 टक्क्यांनी वधारुन निर्देशांकांने उच्चांकी 58,129.95 चा टप्पा प्राप्त केला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 89.45 अंकांनी मजबूत होत निर्देशांक नवा विक्रम नोंदवत 17,323.60 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग सर्वाधिक चार टक्क्यांनी वधारले असून यासोबत टायटन, टाटा स्टील, बजाज ऑटो, मारुती सुझुकी आणि डॉ. रेड्डीज लॅब यांचे समभाग नफा कमाईत राहिले आहेत. अन्य कंपन्यांपैकी हिंदुस्थान युनिलिव्हर, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि इंडसइंड बँकचे समभाग तेजीत राहिल्याचे दिसून आले आहे.
दिवसभरातील प्रमुख कंपन्यांच्या मदतीने धातू आणि वाहन क्षेत्रातील कामगिरीने देशातील बाजार मजबूत राहिला होता. यामध्ये आरआयएलमध्ये मजबूत तेजी दिसली आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून होणारी गुंतवणूक सुरु असल्याने भारतीय निर्देशांकांने भक्कम स्थिती प्राप्त केली असल्याचे अभ्यासकांनी नमूद केले आहे. आशियातील अन्य बाजारांमध्ये शांघाय आणि हाँगकाँग नुकसानीत राहिले असून सियोल व टोकीओ तेजीत राहिले आहेत.
आर्थिक व दैनंदिन वापरातील साहित्य बनविणाऱया कंपन्या वगळता अन्य कंपन्यांचे निर्देशांक लाभात राहिले होते. मुख्य स्वरुपात विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची गुंतवणुकीमधील तेजी व देशातील भांडवली प्रवाह कायम राहणार असून चालू आठवडय़ात हा आकडा 3.5 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.