सेन्सेक्स 35 तर निफ्टीत 18 अंकांची तेजीः ओएनजीसी, अदानी समूह नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी सोमवारी सुरूवातीची कमावलेली तेजी दिवसअखेर गमावून किंचीत वाढीसह दोन्ही निर्देशांक बंद झाल्याचे दिसून आले. सलग दोन सत्रातील घसरणीनंतर सोमवारी शेअर बाजार सावरलेला दिसला. ऊर्जा, आयटी व फार्मा कंपन्यांच्या समभागांमध्ये विक्रीचा ओघ दिसला.
सोमवारी सरतेशेवटी सेन्सेक्सचा निर्देशांक 35 अंकांच्या वाढीसह 50,441.07 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 18 अंकांच्या वाढीसह 14,956.20 अंकांवर बंद झाला. एकावेळी दिवसभरात सेन्सेक्स 667 अंकांच्या तेजीसह व्यवहार करत होता. पण जागतिक बाजारांनी नकारात्मक कल दाखविल्याच्या परिणामानंतर बाजार तेजी कायम टिकवू शकला नाही.
सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी शेअरबाजाराने चांगली सरुवात केली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स निर्देशांक 289 अंकांच्या वाढीसह 50694.85 व निफ्टी निर्देशांक 95 अंकांच्या वाढीसह 15033.50 वर व्यवहार करत होता. बँकिंग व धातू कंपन्यांचे समभाग सोमवारी तेजी दर्शवत व्यवहार करत होते. रिलायन्सचा समभागही 2 टक्के वाढीसह व्यवहार करत होता. गुंतवणूकदारांनी सरकारी बँक व धातू क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग खरेदी करण्यात रस दाखवला. निफ्टी बँक निर्देशांक 2.2 टक्के तेजीसह तर धातू निर्देशांक 1.4 टक्के तेजीत होता. ओएनजीसीचा समभाग 3.8 टक्के वाढीसह तर इंडसइंड बँकेचा समभाग 1.9 टक्के घसरणीसह व्यवहार करत होता. रिलायन्सचा समभाग 1.82 टक्के वाढीसह कार्यरत होता. गेल्या 15 दिवसांत रिलायन्सच्या समभागात 10 टक्के वाढ नोंदली गेली. कंपनीचे बाजार भांडवल 14 लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते.
सोमवारी अदानी उद्योग समूहाच्या सर्वच समभागांमध्ये तेजी दिसली. वॉरबर्ग पिंक्स यांनी अदानी पोर्ट्समध्ये 800 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून त्यामुळेच समूहाचे समभाग तेजीत आहेत. अदानी पॉवर 5 टक्के तेजीसह, अदानी पोर्ट 1.12 टक्के वाढीसह आणि अदानी गॅसचा समभाग 2.83 टक्के वाढीसह व्यवहार करत होता.
सेन्सेक्समधील एनटीपीसी, ऍक्सिस बँक, महिंद्रा आणि महिंद्रा, एचडीएफसी बँक व स्टेट बँक यांचे समभाग 4 टक्के तेजीत होते. सेन्सेक्समधील 30 पैकी 21 समभागांमध्ये तेजी होती. अमेरिकेत 1900 अब्ज डॉलर्सच्या प्रोत्साहन पॅकेजला मंजुरी मिळाल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. आशियाई बाजारासह अन्य बाजारही सकारात्मक कल दाखवत होते. अमेरिकेत मागच्या महिन्यात 3 लाख 79 हजार जणांना रोजगार प्राप्त झाला असल्याची माहिती बाजारात देण्यात आली.