वार्ताहर / पुसेगाव :
कोरोनाच्या नियमावलीचे पालन करीत लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव ता. खटाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या 74 व्या पुण्यस्मरणानिमित्त शनिवारी रथोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच भाविक-भक्तांनी मनोभावे सेवागिरी महाराजांच्या रथावर 30 लाख 56 हजार 766 रुपये देणगी अर्पण केली असल्याची माहिती श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन मोहनराव जाधव व विश्वस्तांनी दिली.
गेल्या दोन वर्षांपासून भक्तांच्या दानधर्मात वाढ झाल्याचे दिसून येते आहे. महाराष्ट्रासह व आंध्र, कर्नाटक गुजरात राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या सेवागिरी महाराजांच्या रथयात्रेत एका दिवशी रथावर एवढी प्रचंड मोठी देणगी जमा होणारे सेवागिरी देवस्थान ट्रस्ट हे धार्मिक स्थळ आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने सेवागिरी महाराजांच्या रथ मिरवणुकीस परवानगी नाकारली. सेवागिरी देवस्थान ट्रस्टने मंदिराच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते रथपूजन करूनच रथोत्सव साजरा केला. यावेळी भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या दोन हजार, पाचशे, शंभर, पन्नास, वीस, दहा रुपयांच्या नोटांच्या माळांनी रथ शृंगारला होता. 30 लाख 41 हजार रुपयांच्या नोटा तर 15 हजार 670 रुपयांची नाणीं देणगी स्वरूपात दान केली.एकूण 3 लाख 56 हजार 766 रुपयांची रक्कम भाविकांनी मनोभावे दान केली. सायंकाळी रथावरुन नोटांच्या माळा एकत्र करुन संबंधित कमिटीने सर्व रक्कम नारायणगिरी महाराज भक्त निवासात नेली. सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली विविध वित्त संस्थांचे अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थांच्या मदतीने रथावरील देणगीची सर्व रक्कम मोजण्यात आली. रात्री 11.30 वाजता प्रत्यक्ष देणगी रक्कम मोजण्यास प्रारंभ झाला. पहाटे 4 वाजता देणगी रक्कम मोजण्याचे काम पुर्ण झाले.