वादग्रस्त कर्लिजचे 80 टक्के बांधकाम पाडले
प्रतिनिधी / म्हापसा
देशभरात गाजलेले सोनाली फोगट खून प्रकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सीबीआयकडे सुपूर्द केल्यानंतर काल गुरुवारी सायंकाळी सीबीआय अधिकाऱयांचे पथक गोव्यात दाखल झाले असून आज शुक्रवारी ते हणजूण पोलीस स्थानकास भेट देऊन आपल्यास हवी असलेली माहिती तसेच चौकशीसाठी लागणाऱया सर्व कागदपत्रांच्या फाईल्स आणि विविध प्रकारचे पुरावेही आपल्या ताब्यात घेणार आहेत.
दरम्यान या खून प्रकरणामुळे वादग्रस्त ठरलेल्या वागातोर येथील कर्लिज शॅक नाईट बार अँड रेस्टॉरंटवरील कारवाई काल गुरुवारी पाचव्या दिवशी सुरूच होती. आतापर्यंत कर्लिजचे सुमारे 80 टक्के बेकायदा बांधकाम मोडून पूर्ण झाले आहे.
हरियाणा येथील भाजप नेत्या तसेच अभिनेत्री सोनाली फोगट गोव्यात आल्या असता ‘कर्लिज’मध्ये त्यांना मृत्यू आला होता. त्यांचे सचिव सुधीर सांगवान व मित्र सुखविंदरसिंग हे तिघेही रात्रीच्या भोजनासाठी कर्लिजमध्ये गेले असता सुधीर व सुखविंदर सिंग यांनी त्यांच्या पेयामध्ये अमलीपदार्थ घालून पाजले होते. सकाळी त्यांच मृत्यू झाला. प्रथम त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे भासविण्यात आले. मात्र शवचिकित्सा अहवालात फोगट यांचा मृत्यू नसून तो संशयास्पद खून असल्याचे उघड झाले. त्यानंतर सुधीर व सुखविंदर सिंग यांना अटक झाली, तपासही गतिमान झाला. नंतर मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय घेतला त्या नुसार आता सीबीआय कार्यरत झाली आहे.