तरूण भारत संवाद प्रतिनिधी / तुळजापूर
शुक्रवार दिनांक २३ नवरात्रातील सातवी माळ यानिमित्त श्री तुळजाभवानीची विशेष भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली होती.
तत्पूर्वी सकाळी पहाटे श्री तुळजाभवानीची चरण तीर्थ झाले .यानंतर सकाळी सहा वाजता पंचामृत अभिषेक घाट होऊन श्री तुळजाभवानीस दुग्धअभिषेक व पंचामृत अभिषेक घालण्यात आले. यानंतर नैवेद्य, धुपारती, अंगारा हे दैनंदिन विधी झाल्यावर महंत, भोपे पुजारी अभिजीत पाटील, ॲड. धिरज पाटील, अमर परमेश्वर, अतुल मलबा, समाधान परमेश्वर, संजय सोंजी, सचिन परमेश्वर या भोपी पुजारी बांधवांनी तुळजाभवानीची विशेष भवानी तलवार अलंकार महापूजा मांडली. या पूजेचे वैशिष्ट्य म्हणजे श्री तुळजाभवानी मातेच्या अंगी विविध प्रकारचे शिवकालीन सुवर्ण अलंकार, दागिने घालून सजविण्यात आले होते.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना श्री तुळजाभवानीने स्वप्न दृष्टांत दिला होता. या स्वप्न दृष्टांत त्यांना तुळजाभवानी प्रसन्न होऊन शत्रूवर मात करण्यासाठी व स्वराज्याला विजयी करण्यासाठी श्री तुळजाभवानीने तलवार दिली अशी अख्यायिका सांगितली जाते. याच तलवारीवर छत्रपती शिवाजीराजे यांनी अनेक विजय मिळवले व स्वराज्याचा विस्तार केला अशी ख्याती आहे. या पूजेतून छत्रपती शिवाजीराजे व श्री तुळजाभवानी यांचे दृढसंबंध दाखविले आहेत म्हणून अशा प्रकारची पूजा नवरात्रात मांडली जाते. म्हणून या महापूजेला भवानी तलवार अलंकार पूजा असे म्हणतात. यावेळी उपस्थित पुजारी बांधवांनी व सेवेकऱ्यांनी जय भवानी जय शिवाजी आई राजा उदो उदो चा जयघोष करून दर्शन घेतले.